चांगली बातमी : आता सोनं गहाण ठेवून मिळणार जास्तीचं कर्ज, RBI नं नियमावलीत केले ‘हे’ बदल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी गुरुवारी (दि.6) पत्रकार परिषदेत पतधोरण जाहीर केले. आरबीआयने व्याज दरात कोणताही बदल केला नाही. बँकेने रेपो आणि रिझर्व्ह रेपो रेट आहे तसाच ठेवला आहे. सध्या रेपो रेट 4 टक्के आणि रिझर्व्ह रेपो रेट 3.3 टक्के इतका आहे. या पत धोरणात बँकेने लोन मोरेटोरिम बाबत दिलासा दिला आहे. पण बँकेने सर्व सामान्यांना एक मोठी भेट दिली आहे. भारतात सोन्याच्या किंमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. कोरोना संकटाच्या वेळी ग्राहकांच्या सोयी लक्षात घेऊन आज रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सोने तारण कर्जदरांना मोठा दिलासा दिला आहे. आरबीआय ने सोन्याच्या दागिन्यांवर कर्जाचे मूल्य वाढवले आहे.

आता 90 टक्क्यापर्यंत कर्ज मिळू शकते. आतापर्यंत दागिन्यांच्या मुल्याच्या 75 टक्के कर्ज मिळत होते. तुम्ही ज्या बँक किंवा नॉन-बँकिंग फायनान्सिंग कंपनीमध्ये गोल्ड लोनसाठी अर्ज कराल, त्याठिकाणी आधी तुमच्याकडे असणाऱ्या सोन्याची शुद्धता आणि गुणवत्ता तपासण्यात येते. सोन्याच्या गुणवत्तेच्या हिशोबाने तुम्हाला मिळणाऱ्या कर्जाची रक्कम ठरवली जाते. बँकांकडून सोन्याच्या दागिन्यांच्या एकूण मुल्याच्या 75 टक्के रक्कम कर्ज म्हणून दिली जात होती. आता हे मूल्य 90 टक्के केले आहे.

आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी याबाबत घोषणा केली. तज्ज्ञांच्या मते कोरोनाच्या या संकटकाळात आरबीआयकडून करण्यात आलेली ही घोषणा फायदेशीर ठरेल. कारण सामान्य नागरिक किंवा छोटे व्यापारी सोन्याच्या दागिन्यांवर अधिक कर्ज घेऊ शकतील. 31 मार्च 2021 पर्यंत या योजनेचा लाभ घेता येणार आहे. सोन्याच्या दागिन्यांवर कर्ज घेणाऱ्यांना सोन्याची शुद्धता तपासून कर्ज देण्यात येते. दरम्यान 18 ते 24 कॅरेट सोन्यावर कर्ज घेण्याऱ्यांना यातून चांगली रक्कम घेता येते.