आगामी 6 महिन्यात बुडीत कर्जात होऊ शकते प्रचंड वाढ, RBI चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतातील बुडीत कर्जाबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी चिंता व्यक्त केली आहे. कोरोना संसर्गाच्या काळात करण्यात आलेल्या लॉकडाऊन आणि त्यातील कंटेन्टमेंट मुळे कंपन्यांवर नकारात्मक परिणाम झाला आहे आणि त्यापैकी बऱ्याच जणांना कर्जाच्या हप्त्याची परतफेड करण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे येत्या सहा महिन्यांमध्ये बँकांच्या एनपीए-नॉन परफॉर्मिंग ऍसेट ( NPA- Non Performing Assets ) मध्ये लक्षणीय वाढ होऊ शकते. तसेच ही समस्या जेवढ्या लवकर समजेल तेवढंच फायदेशीर ठरेल, असं राजन यांनी म्हटलं आहे. ते नॅशनल कौन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्च (एनसीएईआर) आयोजित इंडिया पॉलिसी फोरम २०२० च्या अधिवेशनात बोलत होते.

राजन बोलताना पुढं म्हणाले, भारतीय अर्थव्यवस्थेचे एक सकारात्मक परिणाम म्हणजे कृषी क्षेत्र आहे. हे क्षेत्र खरोखरच चांगले काम करत आहे. मोदी सरकराने सुधारणांना वाव दिला पाहिजे. त्याआधी या सुधारणांची बरेच वर्ष फक्त चर्चा सुरु होते. आता त्यांची अंमलबजावणी झाल्याने अर्थव्यवस्थेचा तो मोठा भाग ठरणार आहे. तसेच जनधन खात्याची फक्त मोठ्या प्रमाणात जाहिरात करण्यात आली, मात्र त्याप्रमाणे काम दिसले नाही.

कृषी क्षेत्राच्या कामगिरीचा भारताने फायदा घ्यावा : सुब्बाराव
देशात मान्सून अनुकूल असल्याची शक्यता असताना कृषी क्षेत्राच्या कामगिरीचा फायदा घेऊन सरकारने वाढीस प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचं मत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे आणखी एक माजी गव्हर्नर डी सुब्बाराव यांनी मांडलं आहे. एनसीएईआरच्या आर्थिक संशोधन संस्थेने मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या वेबिनार मध्ये ते बोलतं होते. सुब्बाराव म्हणाले, ग्रामीण अर्थव्यवस्था शहरी अर्थव्यवस्थेपेक्षा काहीशी चांगली कामगिरी करताना दिसत आहे. शहरी अर्थव्यवस्था अद्याप कोरोना संसर्गाच्या संकटात आहे. एकूण लोकसंख्येपैकी ग्रामीण अर्थव्यवस्था ६५ टक्के आहे, तर त्यांचा सकळ देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) २५ टक्के वाटा आहे. मनरेगाच्या विस्तारित खर्चामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था थोडी सुधारल्याचे सिद्ध झालं आहे.

सुब्बाराव यांनी म्हटलं की, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत खर्च आणि भारतीय खाद्य महामंडळाने शेतीमाल खरेदी केल्याने शेतकऱ्यांच्या हाती पैसा आला आहे. त्याशिवाय कृषी क्षेत्रातील स्थिती सुद्धा पावसाळ्यापेक्षा चांगली होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्याच्या कमकुवत परिस्थितीमध्ये काही चांगले परिणाम दिसण्याची शक्यता आहे. त्याचा आपण कसा फायदा घेतो आणि अर्थव्यवस्थेच्या विकासाला कसे प्रोत्साहित करतो हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे, असं सुब्बाराव यांनी सांगितलं.