कार्यकाळ संपण्यापूर्वीच उर्जित पटेल यांचा राजीनामा 

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन  – रिझर्व्ह बँकेचे गव्हर्न उर्जित पटेल यांनी आज (सोमवार) तडकाफडकी राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे भारतीय अर्थजगताला मोठा धक्का बसला आहे. सरकार आणि रिझर्व्ह बँकेत सुरु असलेल्या वादातून त्यांनी राजीनामा दिला असल्याची चर्चा आहे. उर्जित पटेल यांच्या राजीनाम्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

अचानक राजीनामा देण्याविषयी बोलताना  उर्जित पटेल म्हणाले की ,’वैयक्तिक कारणांमुळे रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पदावरुन तात्काळ पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. गेली अनेक वर्ष रिझर्व्ह बँक ऑफ इंडियासाठी विविध भूमिका बजावणं ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे .”

जन्माने भारतीय नसले, तरीही गेल्या पंचवीस वर्षांतील भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्रवासाचे एक साक्षीदार असलेले पटेल यांनी कृतीतूनच या सगळ्याला उत्तर दिले. नैरोबीमध्ये जन्म व शिक्षण झालेले पटेल यांनी त्यानंतर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, ऑक्सफर्ड व येल विद्यापीठात आपले शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीत काम करताना त्यांची नियुक्ती भारतात झाली. त्यानंतर गेली २०-२२ वर्षे ते भारतीय अर्थव्यवस्थेशी निगडित आहेत.

अनेक महत्त्वाच्या समित्यांवर त्यांनी काम केले. त्याचप्रमाणे अनेक क्षेत्रातील आर्थिक सुधारणांचा आराखडा तयार करण्यातही त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला आहे. पुढील महिन्यात त्यांच्या गव्हर्नरपदाला दोन वर्षे पूर्ण होतील.