खुशखबर ! 30 वर्षापुर्वी परकीय चलनाचा साठा गेला होता शून्याच्या जवळ, देशानं ‘असा’ गाठला 500 अरब डॉलरचा ‘खास’ टप्पा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  दर आठवड्याप्रमाणे यावेळेसही केंद्रीय रिझर्व्ह बँकेने परकीय चलन साठ्यातील आकडेवारी जाहीर केली आहे. यावेळची आकडेवारी विशेष आहे. खरतर पहिल्यांदाच भारताचा परकीय चलन साठा ५०० अब्ज डॉलर्सच्या पुढे गेला आहे. यासह चीन आणि जपाननंतर भारताचा परकीय चलन साठा सर्वात जास्त झाला आहे. या टप्प्यात पोहोचण्यासाठी भारताला सुमारे ३० वर्षांचा कालावधी लागला आहे.

आनंद महिंद्रा यांना आठवला तो काळ

भारतातील उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही त्या काळाचा उल्लेख करत या नव्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. आनंद महिंद्रा म्हणाले, ‘३० वर्षांपूर्वी भारताचा परकीय चलन साठा जवळपास शून्य झाला होता. आता आपल्याकडे तिसरा सर्वात मोठा जागतिक साठा आहे. सध्याच्या वातावरणात ही बातमी मनोबल वाढवणारी आहे. आपल्या देशाची क्षमता विसरु नका आणि आर्थिक विकासाच्या मार्गावर परतण्यासाठी त्याचा योग्यरित्या वापर करा.’ पण प्रश्न असा आहे की, ३० वर्षांपूर्वी परकीय चलन साठ्यावर संकट का आले होते?

काय झाले होते ३० वर्षांपूर्वी?

१९९० च्या दशकात भारताचा परकीय चलन साठा खालच्या पातळीवर होता. साठा इतका घसरला होता की, भारताकडे केवळ १४ दिवसांच्या आयातीसाठी विदेशी चलन बाकी होते. अशी परिस्थिती निर्माण झाली होती की, भारत सरकारने २१ टन सोने बँक ऑफ इंग्लंडला पाठवले, जेणेकरून त्याबदल्यात परकीय डॉलर्स मिळतील. या डॉलरच्या माध्यमातून सरकारला आयातित वस्तूंसाठी पैसे द्यायचे होते. भारतासह जगभरात बहुतेक व्यवसाय फक्त डॉलरमध्ये केले जातात. अशात परकीय चलन साठ्यात डॉलरची अधिक उपलब्धता असणे आवश्यक आहे.

आखाती युद्धानंतर परिस्थिती बिघडली

१९९० च्या दशकात भारताचा परकीय चलन साठा घसरण्याची अनेक कारणे आहेत. सर्वात मोठे कारण म्हणजे १९९० चे आखाती युद्ध आहे. या युद्धानंतर कच्च्या तेलाच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. प्रामुख्याने कच्च्या तेलाच्या आयातीवर अवलंबून असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला फटका बसला होता. त्याच वेळी युद्धाच्या वातावरणात भीतीमुळे परदेशात राहणारे भारतीय नागरिक मायदेशी परतू लागले होते.

परदेशात काम करणाऱ्या भारतीयांच्या कमाईमुळे देखील परकीय चलन साठा वाढत असल्याने हा आणखी एक धक्का होता. जगभरात वेगवेगळ्या देशांमध्ये काम करणारे भारतीय त्यांच्या मिळकतीचा काही भाग आपल्या कुटुंबाला पाठवतात. बहुतेक पैसे डॉलरमध्ये असल्याने परकीय चलन साठा मजबूत होतो.

या परिस्थितीतून कसा बाहेर पडला देश?

जेव्हापासून देशाने उदारीकरणाचे आर्थिक धोरण स्वीकारले आहे, तेव्हापासून परकीय चलन साठा वाढू लागला आहे. याची सुरुवात देशाचे माजी पंतप्रधान नरसिंह राव यांनी केली होती. तत्कालीन अर्थमंत्री मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वात त्यांनी बरेच मोठे निर्णय घेतले. या निर्णयांतर्गत परदेशी गुंतवणूकीची मर्यादा वाढवण्यात आली. तसेच परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक प्रकारचे दर कमी केले गेले. शेअर बाजार आणि बँकिंगमधील सुधारणांसाठी आवश्यक ती पावले उचलली गेली.

आता वाढ का होत आहे?

रिझर्व्ह बँकेच्या ताज्या आकडेवारीनुसार, ५ जून रोजी संपलेल्या आठवड्यात ८.२२ अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे आणि यामुळे परकीय चलन साठा वाढून ५०१.७० अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे. परकीय चलन साठ्याची ही रक्कम एका वर्षाच्या आयात खर्चाइतकी आहे. परकीय चलन साठ्यात वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे कच्च्या तेलाची मागणी कमी होणे.

गेल्या मार्चपासून भारतात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे इंधनाची मागणी कमी झाली होती. अशात भारताने कच्च्या तेलाची आयात कमी केली. याव्यतिरिक्त परकीय गुंतवणूक देखील परकीय चलन साठा वाढण्याचे कारण आहे. गेल्या तीन-चार महिन्यांत भारतीय बाजारात परदेशी कंपन्यांची गुंतवणूक वाढली आहे.