२० रुपयाची नवी नोट चलनात येणार ; ‘अशी’ असेल नवीन नोट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) लवकरच २० रुपयाची नवी नोट चलनात आणणार आहे. २० रुपयांची नवी नोट चलनात येणार असली तरी चलनात असलेल्या २० रुपयांच्या जुन्या नोटांना कोणताही धोका नाही. नव्या नोटेसोबत जुन्या नोटाही पूर्ववतपणे चलनात राहतील, असे आरबीआयने स्पष्ट केले आहे.

अशी असेल नवीन नोट –

२० रुपयाच्या नव्या नोटेचा रंग हा हिरव्या आणि पिळव्या रंगाच्या मिश्रणातील रंग (हिरवट पिवळा) असेल. या नोटेची साईज ६३mm बाय १२९mm अशी आहे. या नोटेच्या मागील बाजूस भारताचा सांस्कृतिक ठेवा असलेल्या वेल्लोरा लेणींचे चित्र असणार आहे. तसेच स्वच्छ भारतचा लोगो आणि घोषवाक्यादेखील छापण्यात आले आहे. अधिकृत नोट ओळखता यावी यासाठी काही विशिष्ट चिन्हांचा आणि खुणांचा वापर या नोटेवर करण्यात आला आहे.या नोटेवर RBI चे विद्यमान गव्हर्नर शक्तिकांत दास यांची स्वाक्षरी असणार आहे.

नोटाबंदीनंतर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये अमुलाग्र बदल झाले आहेत. तर रिझर्व्ह बँकेनेही बहुतांश नवीन नोटांचा भारतीय चलनात समावेश केला आहे. त्यानुसार, सर्वप्रथम,५०० आणि २ हजारांच्या नव्या नोटा बाजारात आल्या. त्यानंतर २०० रुपयांची , ५० रुपयांची १० रुपयांची आणि आता १०० रुपयांची नवीन नोट बाजारात आणली. आता त्यांनतर २० व ५० रुपयांच्या नवीन नोटा बाजारात येणार आहेत. २०१६ च्या आरबीआयच्या वार्षिक अहवालात या नोटांमध्ये होणाऱ्या बदलाचे संकेत देण्यात आले होते.