नोटबंदीने काळा पैसा थांबणार नाही ; RBI ने दिला होता मोदींना इशारा  

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन  – नोटबंदीविषयी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. नोटबंदीचा निर्णय जाहीर होण्याच्या तीन तास आधी झालेल्या आरबीआय बोर्डाच्या बैठकीत काही संचालक सरकारशी पूर्णपणे सहमत नव्हते. तसेच नोटबंदीच्या निर्णयाचा परिणाम दिसणार नाही असे आरबीआय संचालकांकडून सांगण्यात आले होते. एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबत माहिती दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी देशात नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला होता. हा निर्णय जाहीर करण्यापूर्वी  संध्याकाळी साडेपाच वाजता आरबीआय बोर्डाची उर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक झाली होती. या बैठकीत आरबीआयचे विद्यमान गर्व्हनर शक्तिकांत दास, आर गांधी, एसएस मुंदडा सहभागी होते.
 जनहिताचा विचार करुन आरबीआयकडून नोटबंदीला मान्यता-
या बैठकीत  सरकारकडून ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा मोठ्या प्रमाणात बाजारात चलनात आल्या आहेत या मुद्द्यावर चर्चा झाली. नोटबंदीमुळे बनावट नोटा, काळा पैशावर नियंत्रण मिळवता येईल तसेच डिजिटल पेमेंटबद्दल जास्तीत जास्त जागरुकता निर्माण करता येईल असे सरकारकडून सांगण्यात आले होते. मात्र बोर्डातील सदस्यांनी महागाईच्या तुलनेत वाढलेल्या चलनाचं प्रमाण नगण्य आहे त्यामुळे अर्थव्यवस्थेवर याचा परिणाम होणार नसल्याचे सांगितले. आर्थिक विस्ताराच्या गतीपेक्षा मोठया चलनाच्या नोटा वेगाने वाढत आहेत हा सरकारचा दावाही काही संचालकांनी खोडून काढला होता. देशाच्या जीडीपीवर याचा नकारात्मक परिणाम होईल अशी भिती सुद्धा काही संचालकांनी व्यक्त केली होती. असे काही आक्षेप असून सुद्धा जनहिताचा विचार करुन आरबीआय बोर्डाने या निर्णयाला  मान्यता दिली होती.