रिझर्व्ह बँकेने रेपो रेट वाढवले; आता कर्ज देखील महागणार

मुंबईः वृत्तसंस्था

देशात पेट्रोल -डिझेल आणि गॅस दराच्या वाढीनंतर आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून रेपो रेट, रिव्हर्स रेपोमध्ये वाढ करण्यात आली आहे. व्याजदर वाढल्यामुळे आता याचा फटका ग्राहकांना बसणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2018-19या आर्थिक वर्षातील पहिले पतधोरण आज जाहीर केले त्या दरम्यान ही माहिती देण्यात आली. या नव्या नियमानुसार रेपो रेटमध्ये 0.25 टक्क्यांनी वाढ करून तो 6.25 टक्क्यांवर नेण्यात आला आहे.तर रिव्हर्स रेपो रेट 0.25 टक्क्यांची वाढ नोंदवून तो 6 टक्क्यांपर्यंत गेला आहे. ऊर्जित पटेल यांनी हे पतधोरण जाहीर केलं आहे. आर्थीक विकासाला गती मिळण्यासाठी व्याजदरात वाढ केल्याचे त्यांनी सांगितले. याच थेट परिणाम आता ग्राहकांवर होणार आहे.

रेपो रेट काय असतो

बँकांची मोठ्या रकमेची गरज पूर्ण करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक देशातल्या बँकांना अल्प मुदतीचे कर्ज देते. या कर्जावर जो व्याजदर आकारला जातो, तोच रेपो रेट. रिझर्व्ह बँकेकडून कमी व्याजदराने कर्ज मिळत असेल तर बँका आपल्या ग्राहकांना कमी व्याजदराने कर्जं देतात. परंतु, हे दर वाढले तर बँकांचे कर्जही महाग होते आणि त्याचा फटका ग्राहकांना बसतो.

रिव्हर्स रेपो रेट काय असतो

बँकांकडे शिल्लक राहिलेली रक्कम बँका अल्प मुदतीसाठी रिझर्व्ह बँकेकडे जमा करतात. त्या रकमेवर रिझर्व्ह बँक ज्या दराने व्याज देते त्या दराला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात. हा रिव्हर्स रेपो रेट बाजारातली पैशांची तरलता म्हणजे लिक्विडिटी नियंत्रित करण्याचं काम करतो. जेव्हा बाजारात जास्त लिक्विडिटी असते तेव्हा रिझर्व्ह बँक रिव्हर्स रेपो रेट वाढवते, त्यामुळे जास्तीत जास्त व्याज मिळवण्यासाठी बँका स्वतःच्या रकमा रिझर्व्ह बँकेकडे जमा करतात. परिणामी बाजारातल्या पैशांची तरलता कमी होते.