खुशखबर…! गृह, वाहन कर्जासह हप्ताही होणार कमी  

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नुकताच भाजप सरकारकडून अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यात सामान्य नागरिकांना दिलासा देणाऱ्या घोषणा केल्या गेल्या. त्यानंतर सामान्य नागरिकांसाठी आणखी एक खुशखबर रिझर्व्ह बँकेने दिली आहे. लवकरच गृहकर्ज आणि वाहन कर्ज स्वस्त होणार आहे. त्यामुळे स्वप्नातलं घर आणि मनासारखी गाडी घेणे आता आणखी आनंददायक असणार आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की,  रिझर्व्ह बँकेचे द्वैमासिक पतधोरण जाहीर झाले असून त्यानुसार रेपो दरात ०. २५ टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. त्यामुळे रेपो दर ६.२५ टक्के तर रिझर्व्ह रेपो दर ६ टक्के झाला आहे. त्यामुळे गृहकर्ज आणि वाहनकर्जाचे दर कमी होणार आहेत. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पतधोरण समितीच्या बैठकीत ही घोषणा केली आहे.

रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेला सर्व प्रकारची कर्जे स्वस्त होणार आहेत. तसेच सध्या सुरु असलेल्या कर्जांवरील व्याजदरही कमी होणार असल्याने बँकेचा हप्ताही कमी होणार आहे. २८ जानेवारी रोजी सरकारी बँकांसोबत झालेल्या बैठकीत गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी दर कमी करण्याचे संकेत दिले होते.