IDBI बँकेसंदर्भात RBI ने घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – खासगी क्षेत्रातील बँक IDBI बँकेच्या खातेधारकांसाठी आता एक आनंदाची बातमी आली आहे. मागच्या ४ वर्षांपासून रिझर्व्ह बँकेच्या देखरेखीखाली आणि निर्बंधांमधून बँकेला आता मुक्त करण्यात आलं आहे. बँकेची उत्तम स्थिती पाहता बँकेला सर्व निर्बंधांमधून मुक्त करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेकडून घेण्यात आला आहे.

रिझर्व्ह बँकेने IDBI बँकेला प्रॉम्प्ट करेक्टिव्ह अ‍ॅक्शन म्हणजेच पीसीएच्या सूचीतून बाहेर काढले आहे. रिझर्व्ह बँकेने आर्थिक स्थिती बिकट असल्यामुळे २०१७ मध्ये बँकेला पीसीए श्रेणीत ठेवण्याचा निर्णय घेतला होता. लोन रिकव्हरी खराब असल्यामुळे आणि बँकेचा एनपी १३.५ टक्के असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला होता. यावेळी बँकेच्या आर्थिक स्थितीत सुधारणा झाल्याचे दिसल्यामुळे तसेच लोन रिकव्हरी यांसारख्या गोष्टी पुन्हा मार्गावर आल्या आहेत. यामुळे बँकेचे खातेधारक सहजरित्या बँकिंग सुविधेचा लाभ घेतील.

पीसीए म्हणजे काय ?
रिझर्व्ह बँकेकडून बँकांना परवाना देण्यात येतो. तसेच बँकांसाठी नियम तयार करण्याचं आणि त्यांच्यावर देखरेख ठेवण्याचे कामसुद्धा करते. काही वेळा बँका आर्थिक संकटांत सापडतात तेव्हा त्या बँकांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी रिझर्व्ह बँक वेळोवेळी मार्गदर्शक सूचना आणि फ्रेमवर्क तयार करत असते. पीसीए हे कोणत्याही बँकेच्या आर्थिक स्थितीचे प्रमाण निश्चित करते. ज्यावेळी बँकेकडे पुरेसं भांडवल नाही किंवा कर्जाच्या दिलेल्या रकमेतून उत्पन्न मिळत नाही किंवा नफा होत नाही, त्यावेळी रिझर्व्ह बँकेकडून त्या बँकेला पीसीएमध्ये टाकण्यात येते. यामुळे बँकेची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते.