RBI कडून लवकरच 100 रुपयाची नवीन नोट ! ‘ना भिजणार – ना फाटणार’, जाणून घ्या ‘विशेषता’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) लवकरच 100 रुपयांची नोट जारी करणार आहे. या नोटेची खासियत म्हणजे ती लवकर फाटणार नाही. म्हणजे सध्याच्या नोटांपेक्षा ती दुप्पट टिकाऊ असणार आहे. सरकारने आरबीआयद्वारे पाच केंद्रात प्रायोगिक परीक्षणाच्या आधारावर वॉर्निश असलेल्या 100 रूपये मुल्यांच्या एक अब्ज नोटांची सुरूवात करण्यास मंजूरी दिली आहे. अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकुर यांनी एका प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे.

ठाकुर यांनी म्हटले आहे की, सरकारने आरबीआयद्वारे पाच केंद्रात – शिमला, जयपुर, भुवनेश्वर, म्हैसूर आणि कोचीमध्ये प्रायोगिक परीक्षणाच्या आधारावर 100 रूपये मुल्याच्या एक अब्ज नोटांची सुरूवात करण्याची परवानगी दिली आहे. या नोटा टिकाऊ असल्याने जास्त कालावधीसाठी वापरात राहू शकतात.

ना कापणार, ना फाटणार
या नव्या नोटा जास्त सांभाळून ठेवण्याची गरज भासणार नाही. कारण या नोटा लवकर कापणार नाहीत, आणि फाटणार नाहीत. कारण यावर वॉर्निश पेंट लावलेला असणार आहे. होय, तेच वॉर्निश जे आपण लाकूड किंवा लोखंडाला पेन्ट करताना वापरतो.

अनेक देशात वापरले जाते वॉर्निश
भारतच असा पहिला देश नाही, जेथे वॉर्निश लावलेल्या नोटा वापरल्या जाणार आहेत. सध्या जगात अनेक देशात वॉर्निश नोटा वापरल्या जात आहेत. आता भारतीय रिझर्व्ह बँकेने सुद्धा अशा नोटा देशात वापरण्याचा निर्णय घेतला आहे. नोटा खराब होण्यापासून वाचवण्यासाठी वॉर्निशचा वापर केला जातो.

का उचलले जात आहे पाऊल
सध्या नोटा लवकर खराब होत आहेत. तसेच त्या लवकर फाटतात आणि खराब होतात. रिझर्व्ह बँकेला दरवर्षी फाटलेल्या, कापलेल्या आणि मळलेल्या लाखो-करोडो नोटा बदलून द्याव्या लागतात. सर्वसाधारणपणे पाचपैकी एक नोट प्रत्येक वर्षी चलनातून दूर करावी लागते. यावर मोठा खर्च होतो. ही समस्या दूर करण्यासाठी अनेक देश प्लास्टिक नोटांचा वापर करतात.