PMC बँकेवर RBI चे निर्बंध, 6 महिन्यात फक्‍त 1000 रूपये काढता येणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नागरिकांच्या हिताचे कारण सांगत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मुंबईस्थित पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेवर सहा महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध लादले आहेत. या निर्बंधाअतर्गत खातेदार आपल्या बँकेतून एक हजार इतकीच रक्कम काढू शकतात. तसेच बँकेवर नवीन कर्ज देणे आणि नवीन कर्ज स्वीकारणे याबाबतही निर्बंध लादण्यात आले आहेत. या बाबतचा आदेशच रिझर्व्ह बँकेने काढला आहे.

नेमकं काय म्हणलंय रिझर्व्ह बँकेने आपल्या आदेशात ?

बँकेची सद्यस्थिती पाहता नागरिकांच्या हितासाठी बँकेवर निर्बंध आणणे गरजेचे होते. २३ सप्टेंबर पासून बँकेने रिझर्व्ह बँकेच्या मान्यतेशिवाय कोणतेही नवे कर्ज देऊ नये. जुन्या कर्जांचे नूतनीकरण करू नये.
बँकेने कोणतीही गुंतवणूक करू नये, तसेच नव्या ठेवी स्वीकारू नयेत.

कर्ज फेडण्यासाठी कर्जदार त्यांच्या ठेवींचा वापर करू शकतात. मात्र, अशा खात्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण असणे आवश्यक आहे. हे निर्बंध सहा महिन्यासाठी लागू असतील व त्याचा पुन्हा आढावा घेतला जाईल.

ठेवीदाराला खात्यातून केवळ हजार रुपये काढता येणार आहेत. मात्र ठेवीदार बँकेकडे कर्जदार असेल तर ही रक्कम कर्ज खात्यात जमा होईल. नंतर हीच रक्कम त्याच व्यक्तीच्या नावाने त्याच दराने पुन्हा गुंतवता येईल. या काळात बँकेला कर्मचाऱ्यांचे पगार, जागेचे भाडे, कर, विज बिल, प्रिंटिंग व स्टेशनरी. पत्रव्यवहार कायदेशीर खर्च यासाठी खर्च करता येईल. मात्र, वकिलांना प्रत्येक खटल्यामध्ये पाच हजारापेक्षा अधिक रक्कम देता येणार नाही.

या निर्बंधांची माहिती बँकेने प्रत्येक ठेवीदाराला देणे बंधनकारक आहे, अशी माहिती रिझर्व्ह बँकेचे कार्यकारी संचालक डॉ. रबी मिश्रा यांनी दिली आहे. बँकेची सद्यस्थिती पाहता नागरिकांच्या हितासाठी बँकेवर निर्बंध आणणे गरजेचे असल्याचे रिझर्व्ह बँकेने आपल्या आदेशात म्हंटले आहे.

Visit : policenama.com