आता अनिल अंबानी ‘अमीर’ नाहीत तर ‘कंगाल’ झालेत, इंग्लंडच्या कोर्टात वकिलानं सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एकेकाळी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असणाऱ्या अनिल अंबानी यांचं दिवाळं निघालं असल्याचा असा दावा अनिल अंबानी यांच्या वकिलांनी लंडन कोर्टात केला. वास्तविक, चीनच्या टॉप बँकांनी लंडन कोर्टात अर्ज दाखल केला होता. या अर्जावरील सुनावणीदरम्यान अनिल अंबानी यांच्या वकिलांनी हा दावा केला.

काय आहे संपूर्ण प्रकरण ?
इंडस्ट्रियल अँड कॉमर्शियल बँक ऑफ चायना लिमिटेड, चायना डेव्हलपमेंट बँक आणि एक्झिम बँक ऑफ चायना यांनी कोर्टाकडे अंबानीविरोधात पैसे जमा करण्याचे आदेश जारी करण्याचे आवाहन केले. या बँकांच्या म्हणण्यानुसार, अनिल अंबानी यांनी फेब्रुवारी 2012 मध्ये जुन्या कर्जाची परतफेड करण्यासाठी सुमारे 92.5 दशलक्ष कर्जाच्या वैयक्तिक हमीचे पालन केले नाही. या प्रकरणात चीनच्या प्रमुख बँकांनी अनिल अंबानींकडून 68 दशलक्ष डॉलर्सची वसुली करण्याची मागणी केली आहे.

या खटल्याच्या सुनावणीदरम्यान न्यायाधीश डेव्हिड वॅक्समन यांनी अनिल अंबानी यांना लंडनच्या कोर्टात १०० मिलियन डॉलर्स जमा करण्यास सांगितले आहे. यासाठी कोर्टाने अनिल अंबानी यांना सहा आठवड्यांची मुदत दिली असून म्हटले की, अनिल अंबानी यांची संपत्ती जवळपास शून्य आहे किंवा संकटाच्या परिस्थितीत त्यांचे कुटुंब त्यांना मदत करणार नाही यावर माझा विश्वास नाही.

अनिल अंबानी यांच्या वकिलांचे स्पष्टीकरण
त्याचवेळी, अनिल अंबानी यांच्या वकिलांनी कोर्टाच्या सुनावणीदरम्यान सांगितले की, “अंबानी यांच्या संपत्तीत 2012 पासून सतत घसरण होत आहे. भारत सरकारच्या स्पेक्ट्रम देण्याच्या धोरणात बदल झाल्यामुळे भारतीय दूरसंचार क्षेत्रात अनेक बदल झाले आहेत. अनिल अंबानी यांचे वकील रॉबर्ट हो यांनी कोर्टाला सांगितले की, 2012 मध्ये अंबानीची गुंतवणूक सात अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त होती. आज ती घटून 89 दशलक्ष डॉलर्स झाली आहे. जर त्यांच्या उधाऱ्या यात जोडल्या गेल्या तर ही संपत्ती शून्यावर येईल.

अनिल अंबानी यांच्या जीवनशैलीवर प्रश्न
दरम्यान, अनिल अंबानींच्या लक्झरी लाइफस्टाइलवर बँकांच्या वकिलांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि बँकांच्या वकिलांनी असे सांगितले की दक्षिण मुंबईत अंबानी यांच्याकडे 11 किंवा त्यापेक्षा अधिक लक्झरी कार, एक खासगी जेट, एक नौका आणि एक खास समुद्री पेंटहाउस आहे. आहे त्यानंतर न्यायाधीश डेव्हिड वॅक्समॅन यांनी प्रश्न केला की, “अनिल अंबानी वैयक्तिकरित्या दिवाळखोर आहेत असा आग्रह धरत आहेत.” त्यांनी भारतात दिवाळखोरीसाठी अर्ज दाखल केला आहे का? “देशातील आघाडीचे वकील हरीश साल्वे, जे अंबानीच्या वकिलांच्या टीमचा भाग आहेत, यांनी नकारार्थी उत्तर दिले”.

दरम्यान, रिलायन्स समूहाने कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात अपील करण्याचे संकेत दिले. अनिल अंबानी यांच्या प्रवक्त्याने सांगितले की, “अंबानी ब्रिटीश कोर्टाच्या आदेशाचा आढावा घेत आहेत आणि अपीलाबाबत कायदेशीर सल्ला घेतील.”