Pune News : सामान्य कार्यकर्ता देखील मनात आणलं तर परिसराचा कायापालट करू शकतो – शरद पवार

पोलीसनामा ऑनलाईन टीम : पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक सचिन दोडके यांच्या पुढाकाराने ४५ मीटर उंच राष्ट्रध्वज, “आय लव्ह वारजे” सेल्फी पॉईंट व येथील फुलांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन पवार यांचे हस्ते करण्यात आले. “गावातील सामान्य कार्यकर्ता देखील मनात आणलं तर परिसराचे कायापालट करू शकतो. त्यामुळे समाजातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. लोक तुमची नक्की दखल घेतील,” यावेळी ते बोलत होते.

पवार बोलताना पुढे म्हणाले, सध्याचे लोकप्रतिनिधी जागरूक आहेत. पूर्वी गावात एखादाच स्थानिक नेता असायचा. पण आता पुणे परिसरातील गावे बदलली आहेत. मी जेव्हा या भागातून प्रवास करत असतो तेव्हा नेमके कुठे आलो आहे याचा काही अंदाज येत नाही. एवढा विकास या परिसराचा झाला आहे. दरम्यान, सुप्रिया सुळे म्हणाल्या, राज्यातील महाविकास आघाडी उत्तम गुणांनी पास झाली आहे. तसेच वारजेकर राष्ट्रवादीवर भरोसा ठेवतात. चारही नगरसेवकांनी एकत्रितपणे विकास केल्याचे सांगितले.

सचिन दोडके यांनी प्रास्ताविक करताना उद्यान विभाग, विद्युत विभाग व इतर मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या या दैदीप्यमान कामाचे कौतुक केले. या उंच झेंड्यामुळे परिसराला कायम देशाभिमान जागृत ठेवण्यास प्रेरणा मिळेल असा विश्वास व्यक्त केला. पवार यांनी नगरसेवक दोडके यांच्या कामाचे विशेष कौतुक केले. गावात राहणारा कार्यकर्ता देखील सुशिक्षित लोकांच्या मोठ्या सोसायटीत राहून परिसराचा विकास करतो व असा लहानसा पण देखणा कार्यक्रम करतो याचे त्यांना विशेष वाटले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, आमदार चेतन तुपे, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, नगरसेवक दिलीप बराटे, सचिन दोडके, दिपक मानकर, लक्ष्मी दुधाने, सायली वांजळे, जि प सदस्य अनिता इंगळे, विठ्ठल मणियार, काका चव्हाण, शुक्राचार्य वांजळे आदी मान्यवर उपस्थित होते.