जन्मानंतर इंजेक्शन दिल्यास तात्काळ ‘रिअ‍ॅक्शन’, विषामुळं काळा पडला बाळाचा ‘हात’

मध्य प्रदेश : वृत्तसंस्था – जन्मानंतर नवजात बाळाला इंजेक्शन दिल्यावर त्याला ताप आला. काही दिवसांनंतर जेव्हा कुटुंबियांनी बाळाला पाहिले तर त्याचा हात काळा पडला होता. याबाबत असे म्हटले जात आहे की, त्याला कालबाह्य झालेले इंजेक्शन दिले गेले होते, ज्यामुळे त्याच्या हातात विष पसरले होते. ही घटना मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यातील आहे.

या बाळाचा जन्म २४ ऑगस्ट रोजी विदिशाच्या जिल्हा रुग्णालयात झाला होता. जन्मानंतर बाळाला उपचारादरम्यान हातात इंजेक्शन दिल्यानंतर हात काळे पडण्यास सुरवात झाली. रुग्णालयातील कर्मचार्‍यांनी त्याला एनआयसीयूमध्ये दाखल केले.

या संदर्भात ग्यारसपूरच्या लोहर्रा गावात राहणारे मनोज सेन यांनी सांगितले की, त्यांची पत्नी मिथिलेशने २४ ऑगस्ट रोजी एका निरोगी बाळाला जन्म दिला होता. जन्मानंतरच इंजेक्शन लावल्यावर ताप आला. त्यानंतर बाळाला एनआयसीयू वॉर्डमध्ये दाखल केले.

कुटुंबीयांनी वारंवार विचारले असतानाही त्यांनी या बाळाला दाखवले नाही. ५-७ दिवसानंतर जेव्हा कुटूंबाने पुन्हा दबाव आणला तेव्हा त्यांना सांगण्यात आले की, बाळाला भोपाळच्या कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये रेफर केले गेले आहे.

कुटुंब घाई-घाईत खासगीरित्या भोपाळला पोहोचले तेव्हा बाळाला आयसीयूमध्ये दाखल केल्याचे समजले. कुटुंबाने जेव्हा बाळाचा उजवा हात पाहिला, तेव्हा तो काळा पडला होता.

डॉक्टरांनी कुटुंबियांना सांगितले की, त्याच्या हातात गंभीर संक्रमण झाले आहे आणि आता या हाताचे ऑपरेशन करून कापला जाईल. असे सांगितले जात आहे की, बाळाला कालबाह्य झालेले इंजेक्शन दिल्यामुळे त्याच्या हातात विष पसरले. मात्र डॉक्टर याबाबत अधिकृतपणे काहीही बोलण्यास तयार नाहीत.