देवेंद्र फडणवीसांनी उल्लेख केलेल्या धनंजय गावडेंनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले – ‘कुणी आयुष्यात कायमचं उठेल असं वक्तव्य करू नका’

पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अधिवेशनात (Maharashtra Budget Session 2021) मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी (Mansukh Hiren Death Case) बोलताना पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेची मागणी केली. तसंच त्यांनी नालासोपाऱ्याचे शिवसेनेचे माजी नगरसेवक धनंजय गावडे (Dhananjay Gawade) यांच्या नावाचाही उल्लेख केला. यावर आता धनंजय गावडेंनी प्रतिक्रिया दिली आहे. कुणी आयुष्यात कायमचं उठेल असं वक्तव्य करू नका, पुरावे असतील तर तपास यंत्रणेकडे द्या, असं गावडे म्हणाले आहेत. एका वृत्तवाहिनीसोबत ते बोलत होते. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्या आरोपांचं खंडन केलं.

काय म्हणाले धनंजय गावडे ?

धनंजय गावडे म्हणाले, मला आश्चर्य वाटतंय की, मनसुख हिरेन प्रकरणी माझं नाव आलं आहे. धनंजय गावडे यांना सचिन वाझे नावाचा अधिकारी वाचवत आहे. त्यांना पुरावे विचारण्यात आले होते. त्यांनी नकार दिला होता. प्रवीण दरेकर हे विधान परिषदेचे जबाबदार नेते आहेत. आजही विधानसभेत या प्रकरणाचा उल्लेख केला गेला. मला याबद्दल वाईट वाटत आहे. एवढ्या मोठ्या नेत्यांनी माझ्या नावाचा उल्लेख करावा. एएनआय संस्था, मुंबई पोलीस, महाराष्ट्र एटीएस तपास करत आहेत. फक्त मनसुख यांचे लोकेशन नालासोपाऱ्यात सापडले म्हणून माझं नाव घेणं हे कोणत्या तरी बिल्डर लॉबीला पाठीशी घालण्याचं कारस्थान आहे, असं म्हणत त्यांनी पलटवार केला.

‘पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलंय त्यात माझं नाव नाही’

पुढं बोलताना ते म्हणाले, राहिली गोष्ट खुनाची तर सु्प्रीम कोर्टानं मला अंतरिम जामीन दिला आहे. माझ्या विरोधात कोणतेही गुन्हे दाखल झालेले नाहीत. याबद्दल पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलं असून, त्यात माझं नाव नाही असंही त्यांनी यावेळी बोलताना नमूद केलं.

‘कुणाला आयुष्यात उठवण्याचे प्रयत्न करू नका’

गावडे म्हणतात, कुणाची बदनामी होईल असं वक्तव्य करू नये. कोणत्याही पुराव्याशिवाय बोलू नये. जर पुरावे असतील तर तपास यंत्रणांकडे द्या. पण कुणाला आयुष्यात उठवण्याचे प्रयत्न करू नका, असंही त्यांनी सांगितलं.

‘कोणत्या बिल्डरला वाचवताय, योग्य वेळ आल्यावर नाव समोर येईलच’

गावडे म्हणाले, एका बिल्डरला वाचवण्यासाठी या लोकांनी आपली प्रतिष्ठा वापरायला नको होती. कोणत्या बिल्डरला वाचवत आहेत, याबद्दल योग्य वेळ आल्यानंतर नाव समोर येईलच, असा इशाराही त्यांनी यावेळी बोलताना दिला.

‘वडाचे साल पिंपळाला लावून बिल्डरला वाचवण्यासाठी हे थांबलं पाहिजे’

गावडे असंही म्हणाले की, 2017 च्या गुन्ह्यांबद्दल आज फडणवीस यांनी माझ्या नावाचा उल्लेख केला आहे. परंतु या गुन्ह्यात मी आरोपी नाही. या गुन्ह्यात माझा कोणताही सहभाग नाही. याबद्दल तपास अधिकाऱ्यांनी आपला अहवाल सुप्रीम कोर्टात सादर केला आहे. त्यामुळं वडाचे साल पिंपळाला लावून बिल्डरला वाचवण्यासाठी हे थांबलं पाहिजे, अशी टीकादेखील त्यांनी यावेळी बोलताना केली.