महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्यास तयार, पण निवडणुका वेग-वेगळ्या लढू ! शिवसेनेबाबत भाजपाचं सूचक विधान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात पुन्हा एकदा मोठी राजकीय घडामोडी घडत, आगामी काळात जर शिवसेनेकडून प्रस्ताव आला तर राज्याच्या हितासाठी एकत्र यायला तयार आहोत पण निवडणुका वेगळ्या लढू असं विधान भाजपा प्रदेशाध्यक्ष चद्रकांत पाटील यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केले आहे. त्यामुळे राज्यात शिवसेना-भाजपा एकत्र येणार का ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

याबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले, की येणाऱ्या काळात स्वबळावर सरकार आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी तयार रहावे, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी सांगितले. त्यामध्ये आम्ही यापुढे राज्यात कोणतीही निवडणूक एकत्र लढणार नाही, वेगळी लढणार, निवडणुकीनंतर एकत्र येण्यावर चर्चा होईल. मात्र अद्याप चार वर्षे आहेत. यादरम्यान शिवसेनेच्या बाजूने प्रस्ताव आला तरी निवडणूक वेगळी लढू, प्रस्ताव आल्यास केंद्रीय नेतृत्व विचार करेल, केंद्रीय नेतृत्वाने आदेश दिल्यास आम्ही एकत्रही येऊ असं त्यांनी सांगितले.

तसेच सध्या आम्ही प्रखर विरोधी पक्ष म्हणून काम करणार आहोत. कोरोना काळात जो भ्रष्टाचार सरकारने केला त्याचा बुरखा फाडणार आहोत. गेल्या चार महिन्याच्या कालावधीत जे छुप्या पद्धतीने काम केलं आहे, ते माहिती अधिकारातून बाहेर काढू, आंदोलन करू, प्रमुख आणि प्रबळ अपक्ष 19 आणि भाजपा 105 मिळून विरोधी पक्षाचं काम करू असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

आमची व्होटबँकचा वापर करून मोदींचा चेहरा वापरून निवडून यायचं आणि नंतर दुसऱ्या सोबत संसार करायचा हे आम्हाला मान्य नाही. आम्हाला आमच्या ताकदीवर निवडणुका लढवायच्या आहेत, 2014 वेगळे लढले म्हणून पुन्हा एकत्र आले, हिंमत असेल तर वेगळ्या निवडणूका लढवून दाखवा, तुमच्या फक्त 10 जागा येतील असा टोला चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना लगावला आहे. दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानावर अद्याप शिवसेनेने कोणीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे भाजपच्या विधानावर शिवसेना काय भूमिका घेते यावर जनतेचं तसेच महाविकास आघाडीच्या इतर पक्षांचे लक्ष लागून राहिले आहे.