पुणे-मुंबई रेल्वे प्रवासासाठी सज्ज, फक्त प्रतिक्षा राज्य सरकारच्या हिरव्या कंदिलाची

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. भारतात कोरोना विषाणूने शिरकाव केल्यानंतर देशात लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे देशातील सर्व वाहतूक व्यवस्था बंद करण्यात आली. लॉकडाऊनमुळे मागील पाच महिन्यांपासून देशातील रेल्वे सेवा बंद आहे. मात्र आता अनलॉक 4 मध्ये एसटी बस सेवा सुरु करण्यात आली.

तसेच ई-पास देखील बंद करण्यात आला आहे. त्यामुळे आता पुणे-मुंबई रेल्वे सेवा सुरु करण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या एक्सप्रेस तसेच अन्य मार्गावरील लोकल सेवा सुरु करण्याची मागणी होत आहे. या गाड्या सुरु करण्यास रेल्वे प्रशासनाची पूर्ण तयारी आहे. परंतु, राज्य शासनाकडून हिरवा कंदील मिळाल्याशिवाय या गाड्या सुरु करता येणार नसल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली एसटीची आंतरजिल्हा बससेवा सुरु झाली आहे. या गाड्यांना प्रवाशांचा प्रतिसादही वाढू लागला आहे. पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये गुरुवापासून पीएमपीची बससेवाही सुरु झाली आहे. तसेच राज्य शासनाने सध्या सुरु असलेल्या रेल्वेच्या विशेष गाड्यांना राज्यातील सर्व थांबे घेण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे प्रवाशांना सध्या सुरु असलेल्या गाड्यांमधून आंतरजिल्हा प्रवास करणे शक्य होणार आहे. मात्र, दुसरीकडे राज्यातील विविध शहरांना जोडणाऱ्या या एक्सप्रेस, लोकल व पॅसेंजर गाड्यांना राज्य शासनाकडून अद्याप परवानगी मिळालेली नाही.

लॉकडाऊनपूर्वी पुणे व मुंबईदरम्यान हजारो प्रवासी प्रवास करत होते. मात्र, लॉकडाऊनमुळे बंद असलेल्या रेल्वेमुळे प्रवाशांना आणि नोकरदार लोकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. एसटी बस सुरु करण्यात आल्या आहेत. परंतु त्या वेळेत पोहचत नसल्याने आणि तिकीट दर परवडत नसल्याने लोकांच्या खिशाला झळ पोहचत आहे. त्यामुळे किमान सकाळी आणि संध्याकाळी एक एक्सप्रेस सुरु करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. तसेच पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात कामगारांची संख्या जास्त आहे. त्यांच्यासाठी पुणे-लोणावळा लोकल, पुणे-दौंड डेमु सुरु करण्याची मागणी होत आहे.

रेल्वे प्रशासनाकडून गाड्या सुरु करण्याची तयारी आहे. पण राज्य शासनाने अद्याप अशी कोणतीही मागणी केलेली नाही. या संदर्भात मध्य रेल्वेचे पुणे विभागीय व्यवस्थापक रेणु शर्मा यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, पुणे-मुंबई किंवा इतर मार्गावर गाड्या सुरु करण्याची आमची पूर्ण तयारी आहे. पण हे राज्य शासनावर अवलंबून आहे. त्यांच्याकडून मागणी केल्यानंतर मध्य रेल्वे प्रशासन निर्णय घेईल.