‘जलयुक्त शिवार असो की वृक्षारोपण’, कोणत्याही प्रकारच्या चौकशीला घाबरत नाही : फडणवीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरु होत आहे. त्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष भाजपने आज पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी बोलताना फडणवीस यांनी जलयुक्त शिवार असो की वृक्षारोपण आम्ही कोणत्याही प्रकारच्या चौकशीला घाबरत नाही. उलट 1999 ते 2019 दरम्यानच्या राज्याच्या आर्थिक स्थितीवर श्वेतपत्रिका काढायला हवी. जेणेकरून खरं चित्र जनतेपुढं येईल, अशी भूमिका माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज मांडली.

महाविकास आघाडी सरकारनं फडणवीस सरकारच्या अनेक योजनांची चौकशी करण्याचे संकेत दिले आहेत. यामध्ये प्रामुख्याने जलयुक्त शिवार आणि वृक्षारोपण योजनेचा समावेश आहे. जलयुक्त शिवार हे केवळ एक गोंडस नाव असून त्यापलीकडे काही नाही. या योजनेच्या फक्त घोषणा झाल्या. जलसंधारणाची काम यापुढंही सुरु राहतील मात्र जलयुक्त शिवाराच्या कामांची संबंधित विभागामार्फत चौकशी केली जाईल असे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. तर फडणवीस सरकारच्या काळात नेमकी किती झाडे लावण्यात आली याची चौकशी करणार असल्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी सांगितले होते.

 

यावर फडणवीसांनी भाष्य केले. जलयुक्त शिवार योजना सरकार बंद जरुर करेल, पण जनता ती बंद करु देणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आम्ही कोणत्याही चौकशीला घाबरत नाही. जाणीवपूर्वक लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी उत्तम काम केले असल्याचे फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.