शौर्यशाली मराठे पानिपतावर का पराभूत झाले ; वाचा कारणे 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन (सुरज शेंडगे)

“कौरव पांडव 
संगर तांडव 
व्दापार काली होय आती 
तसे मराठे 
गिलचे साचे 
कलीत लढले पानिपती”

मराठ्यांचे शौर्य सांगणाऱ्या या कवितेच्या ओळी वाचता क्षणी आपणाला पानिपतच्या इतिहासाकडे आकर्षित केल्या शिवाय राहणार नाहीत. मात्र शौर्यशाली मराठ्यांच्या शौर्यावर जखम करून गेलेले युद्ध आणि मराठी देशाची एक पिढी एका दिवसात एकाच मैदानात अदृश्य केलेले भीषण युद्ध म्हणजे पानिपतचे तिसरे युद्ध. जे कि मराठा आणि अहमदशहा अब्दाली यांच्यात लढले गेले. मराठ्यांचा झालेला पराभव हा अब्दालीच्या विजया पेक्षा तेजस्वी होता. अशी नोंद स्वतः अहमदशहा अब्दालीने तत्कालीन कागदपत्रात केली आहे. एवढेच काय तर हे मराठे अटक किल्ल्या पर्यंत आले होते. पराभवाची चीड मनात धरून हे आपल्या राज्यावर आक्रमण करायला सुद्धा कमी पडणार नाहीत अशी भीती मनात धरून अहमदशहा अब्दालीने नानासाहेब पेशव्यांची माफी मागणारे पत्र देखील पुण्याला पाठवून दिले होते. याच पत्रात अब्दाली म्हणाला होता या हिंदुस्थानचे रक्षण करण्याची धमक फक्त मराठ्यांत आहे तुम्ही तुमचे वकील दिल्लीला पाठवून द्या त्यांच्याशी बोलणी करून मराठ्यांच्या हातात दिल्लीचा कारभार देऊन मला मायदेशी निघायचे आहे.
मराठ्यांच्या शौर्याची एवढी दहशत असताना मराठे पानिपतावर हरले कसे याचीच करणे आता पुढे बघायची आहेत.

नवखा सेनापती

१४ जानेवारी १७६० रोजी दिल्लीच्या बुऱ्हाडी घाटावर शिंदे घराण्याचा सरदार दत्ताजी शिंदे मारले गेले. तेव्हा हि बातमी मराठ्यांपर्यंत पोहचायला रंगपंचमीचा दिवस उजडावा लागला. तेव्हा मराठ्यांचे लष्कर औरंगाबादच्या देवगिरी(दौलताबाद) किल्ल्यावर होते. तिथेच मराठ्यांच्या लष्कराची नानासाहेब पेशव्यांच्या नेतृत्वात बैठक झाली आणि अब्दालीचा हुशोब चुकता करण्यासाठी सदाशिवभाऊ पेशवे यांना सेनापती बनवून पाठवायचे असा विचार पक्का झाला. सदाशिवभाऊ शूर सेनानी होते. मात्र त्यांचा स्वभाव हळवा होता. त्यांनी युद्धाच्या काही दिवस आधी फक्त दूध घेणेच उचित मानले होते आणि अन्न त्याग केला होता. उत्तर भारतात सदाशिवभाऊ कधीच गेले नव्हते म्हणून तसा त्यांना उत्तरेचा परिसर नवाच होता. त्यांनी या उत्तर मोहिमे वेळी जिंकलेला लाल किल्ला आणि कुंजपुरा किल्ला त्यांच्या आत असलेल्या नेतृत्व गुणांची साक्ष देणारा आहे मात्र आखरी जंग घोषित करण्यासाठी सदाशिवभाऊंनी उशीर केला आणि मराठ्यांचा ऐन युद्धात पराभव झाला.

उत्तरेच्या राजांनी मराठ्यांची सोडलेली साथ

नजीब खानच्या अमिषाला भुलून अयोध्येचा नवाब सुजाउद्दोला अहमदशहा अब्दालीच्या बाजूने युद्धात लढला. तर भरतपुरच्या ‘सुरुजमल जाट’ राजाने पण मराठ्यांशी वाटाघाटीत स्वार्थ बघून युद्धातून माघार घेतली आणि भरतपूरला जाऊन तटस्थपणे युद्ध पाहणे पसंत केले. त्यानंतर मात्र मराठ्यांच्या मदतीला उत्तरेत कोणीच आले नाही. मराठ्यांची लाख भराची फौज एकटीच अब्दालीला भिडली.

मराठा लष्करातील गटबाजी

दोन महिने पानिपतावर मराठ्यांचे लष्कर उभे राहिले होते. त्याठिकाणी दोन कोसांच्या अंतरावर अब्दालीचे सैन्य उभे होते. बाहेरच्या बाजूने अब्दालीने मराठ्यांच्या लष्कराला घेरण्याचा प्रयत्न सुरु केला होता. सरदार मल्हारराव होळकर हे अब्दालीच्या सैन्यशी गनिमी काव्याने लढण्याचा सल्ला देत होते तर सेनापती भाऊसाहेब पेशवे हे सपाट मैदानी प्रदेशाची सबब देऊन गोलाच्या लढाईला प्राधान्य देत होते. शेवटी गोलाची लढाई करण्याचे निश्चित झाले. तोफखाना प्रमुख इब्राहिम गारदी गोल नमोडता युद्ध करण्याचे नियम सर्वांना सांगून हि सासवडच्या विठ्ठलराव विंचूरकरांनी आपले तीन हजारांचे पथक गोलाच्या बाहेर काढले आणि तोच निर्णय मराठ्यांना पराभवकडे घेऊन गेला.

अब्दालीने तोडलेली रसद आणि उपाशी असणारे मराठे

मराठ्यांना धान्यांची आणि पैशाची रसद पुरवणारे मराठ्यांचे मामलेदार गोविंदपंथ बुंदेले यांना अब्दालीच्या गस्ती पथकाने गाठून त्यांचे मुडके उडवले होते. जांभळाच्या पानात गुंडाळून लाकडी पेटीतून हे मुडके भाऊसाहेब पेशवे यांना अब्दालीने भेट म्हणून पाठवले होते.गोविंदपंथ बुंदेलेयांची हत्या होताच मराठ्यांच्या पोटाची आबळ होऊ लागली शेवटी मराठे सलगआठ दिवस उपाशी असताना सैन्यातील लोकच म्हणून लागले “सेनापती! उपाशी मरण्यापेक्षा लढून मरण्याचे आदेश द्या.” आता युद्धा शिवाय पर्याय नाही हे समजताच भाऊसाहेबांनी १४ जानेवारी १७६१ रोजी संक्रातीच्या सणादिवशी युद्धाला तोंड फोडले आणि मराठ्यांनी पहाटेच्या सुमारास अब्दालीला सामोरे जाऊन युद्धाचा शंख केला.

बाजार बुणगे आणि यात्रेकरूंचे ओझे

पेशव्यांच्या काळात राज्यसत्ता हि अत्यंत धार्मिक झाली होती. याचाच तोटा पानिपतच्या युद्धात झाल्याचा दिसते आहे. उत्तरेत एक हि लढाई नहारलेल्या मराठ्यांना अब्दाली सोबतची  हि लढाई पण आपण जिंकणार असा आत्मविश्वास होता. म्हणून भाऊसाहेबांच्या लढाऊ सैन्या सोबत बाजार बुणगे  आणि यात्रेकरूंची मोठी फौज नानासाहेब पेशव्यांनी दिली होती.  बाजार बुणगे  आणि यात्रेकरूंचे ओझे मराठ्यांच्या लष्कराला झाले होते. या व्यक्तींचा सांभाळ करण्यात मराठा लष्कराची मोठी शक्ती खर्च झाली. म्हणूनच मराठे पानिपतावर पराभवाच्या दिशेने गेले.

मागच्या काही दिवसात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पानिपतच्या तिसऱ्या लढाईत झालेल्या पराभवामुळे देश २०० वर्ष मागे गेला असे विधान केले होते. हे विधान इतिहासाच्या चिंतनातून त्यांनी सिद्ध केले आहे आणि ते अत्यंत सत्य विधान आहे कारण मराठे पानिपतावर पराभूत झाले आणि  इंग्रजांची सत्ता आपले पाय  मजबुतीने रोवायला  सज्ज झाली. आज पानिपतच्या युद्धाला २५८ वर्ष झाली मात्र आजही १४ जानेवारीला या युद्धाच्या आठवणी जागवल्या तर मराठी माणसाचा उर अभिमानाने भरून येतो.

You might also like