पाकिस्तानमध्ये सैन्य-पोलिस आमनेसामने, नवाज शरीफांच्या जावयाला अटक केलेलं प्रकरण पेटलं

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या जावयाला अटक केल्यानंतर इम्रान खान सरकारविरुद्ध विरोधी पक्षांचा संताप आता वाढू लागला आहे. अनेक सभाद्वारे नागरिक सरकारविरुद्ध एकत्र जमत आहेत. यामुळे पाकिस्तानातील वातावरण तापले असून, आता सिंध प्रांताचे पोलीस आणि पाकिस्तानी सैन्य आमने सामने आले आहे. याप्रकरणी सिंध पोलिसांच्या विरोधात सैन्याने चौकशी सुद्धा सुरु केली आहे.

कॅप्टन मोहम्मद सफदर हे शरीफ यांचे जावई आहेत. शरीफ यांच्या मुलीने केलेल्या आरोपानुसार, त्यांच्या हॉटेलच्या खोलीमध्ये तोडफोड करण्यात आली आणि सफदरला पोलीस घेऊन गेले. त्यानंतर पाकिस्तान मध्ये गोंधळ उडाला होता. तद्वतच त्यांच्या अटकेवरुन पाकिस्तानी सैन्याचे प्रमुख कमर जावेद बाजवा यांनी मंगळवारी चौकशीचे आदेश दिले आहेत.

तथापि, पाकिस्तानमध्ये सिंध पोलीस विरुद्ध आयएसआय असा सामना रंगला आहे. सफदर यांना अटक करण्यात आली होती तेव्हा सिंध पोलीस प्रमुखांना एका ठिकाणी घेरण्यात आले होते. त्यानंतर पाकिस्तान सैन्याने लगेचच सफदर यांना अटक केली होती. यानंतर नाराज झालेल्या सिंध पोलिसांच्या आयजींनी सुटीवर जाण्याची घोषणा केली. त्यामुळे सिंध पोलिसांचे हजारो जवानही सुटीवर गेले आहेत. या साऱ्या प्रकारामुळे प्रांतात मोठा गोंधळ उडाला आहे. तसेच लोकही रस्तावर उतरले आहेत. या दबावात येऊन सैन्याने शेवटी सफदर यांच्या अटकेच्या चौकशीचे आदेश दिले.

दरम्यान, सरकारने पोलिसांना सुटीवरून पुन्हा कामावर रुजू होण्याची विनंती केली. त्यानुसार अधिकाऱ्यांनी सुटी मागे घेतली. पाकिस्तानतात इम्रान सरकारविरुद्ध पोलिसांनी बंद करण्यामुळे आता सरकारचा विरोध तीव्र होत आहे. विरोधी पक्ष सातत्याने इम्रान सरकारविरुद्ध सभा घेत आहेत. करचीपासून सर्वत्र या सभा घेण्यात येत आहेत.