आता भारतातही परदेशी विद्यापीठांना मान्यता : डॉ. रमेश पोखरियाल

पोलिसनामा ऑनलाईन – देशातील प्रतिभावान विद्यार्थ्यांना परदेशी जाण्यापासून थांबवण्यासाठी परदेशातील विद्यापीठांना आपल्याकडे त्यांचे शिक्षणसंकुल सुरू करण्यास परवानगी देण्याची तरतूद शिक्षण धोरणात करण्यात आली आहे. आता आपल्या अटींनुसार विद्यापीठे येतील,’ अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री डॉ. रमेश पोखरीयाल यांनी दिली आहे.

डॉ. पोखरीयाल म्हणाले, दरवर्षी जवळपास 7 ते 8 लाख भारतीय विद्यार्थी शिक्षणासाठी परदेशी जातात. त्यामुळे कोटयवधी रुपये परदेशी जातात. आपल्याकडील प्रतिभा आणि पैसा येथेच राहावा यासाठी परदेशी विद्यापीठांनाच भारतात येण्यास मान्यता देण्याची तरतूद करण्यात आली आहे. परदेशी विद्यापीठे आमच्या अटी मान्य करून येतील. यापूर्वी जेव्हा या तरतूद चर्चेत होती, तेव्हा परदेशी विद्यापीठे त्यांच्या अटींवर येणार होती. सध्या 50 हजारांपेक्षा अधिक परदेशी विद्यार्थी भारतात शिक्षणासाठी येतात. अधिकाधिक परदेशी विद्यार्थी भारतात शिक्षणासाठी यावेत आणि त्याचप्रमाणे येथील विद्यार्थी येथेच राहावेत असा उद्देश आहे. परदेशी विद्यापीठे भारतात आल्यावर येथील स्पर्धा वाढेल आणि त्यातून दर्जा वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले.