वाघीरे महाविद्यालय आणि महिला सर्वांगीण उत्कर्ष मंडळ (मासुम) यांच्यात सामंजस्य करार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन (चंद्रकांत चौंडकर) – पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वाघीरे महाविद्यालय आणि

महिला सर्वांगीण उत्कर्ष मंडळ (मासुम) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या सामंजस्य कारारांतर्गत प्रशिक्षण शिबीरे, समुपदेशन कार्यशाळेचे, करिअर मार्गदर्शन शिबोरे यांचे आयोजन करण्यात येणार आहे. मासुम संस्थेच्या माध्यमातून महाविद्यालयात ताणतणाव व्यवस्थापन व समुपदेशन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

मानसशास्त्र विभाग प्रमुख प्रा. सुनील शिंदे यांनी प्रास्ताविक केले. समुपदेशकाची भूमिका आवश्यकता आणि समुपदेशनाची तंत्रे याविषयी मदत करण्याची तंत्रे तसेच मासुम संस्थेच्या कार्या बद्दल मासूमचे संस्थापक डॉ. रमेश अवस्थी माहिती दिली.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ नितीन घोरपडे यांनी मानसशास्त्राच्या विद्यार्थ्यांना समुपदेशन क्षेत्रात मोठा वाव असून तणावाचे व्यवस्थापन होत नसल्याने वाढत जाणाऱ्या समस्या पाहता समुपदेशन क्षेत्रात करिअरची संधी उपलब्ध आहेत. मासुम संस्थेच्या कार्याचा, उपक्रमांचा महाविद्यालयास उपयोग होऊन विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हा करार फायदेशीर ठरेल, असा विश्वास व्यक्त करत सामंजस्य कराराचे महत्त्व अधोरेखित केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संगीता देवकरयांनी केले तर आभार प्रा. सोमनाथ पाटील यांनी मानले. या प्रसंगी मासुमचे कार्यकर्ते वैशाली कुंभारकर, शीतल वाईकर, योगेश धेंडे आदी उपस्थित होते.