राज्यात आरोग्य विभागात 8500 पदांसाठी भरती, 18 जानेवारीला पहिली जाहिरात निघाणार असल्याचं मंत्री टोपे यांनी सांगितलं

पोलीसनामा ऑनलाईनः राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी आरोग्य विभागातील भरती संदर्भातील मोठी घोषणा केली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाकडून लवकरच एकूण 17 हजार पदांची भरती केली जाणार आहे. यापैकी पहिल्या टप्प्यात 8 हजार 500 पदांची भरतीची जाहिरात उद्या सोमवारी (दि. 18) प्रसिद्ध होणार असल्याची माहिती टोपे यांनी दिली आहे.

कोरोना काळात आरोग्य यंत्रणेवर मोठी जबाबदारी होती. मात्र, काही ठिकाणी कर्मचाऱ्यांची कमी जाणवत होती. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरही ताण आला होता. यंत्रणेवरील ताण लक्षात घेता एकूण 17 हजार पदांची भरती होणार आहे. त्यासाठी उद्या (दि.18) भरतीची पहिली जाहिरात निघणार असून 15 फेब्रुवारीपर्यंत भरतीचे कामही पूर्ण होईल. पहिल्या टप्प्यातील भरती ही ग्रामविकास विभागाशी संबंधित आरोग्य विभागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील आहे. या भरतीत क आणि ड वर्गातील पदाची भरती असून नर्सेस, वॉर्ड बॉय, क्लर्क आणि टेक्निशियनचा समावेश असणार आहे. तसेच कोरोना काळात कंत्राटी पद्धतीने काम केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच नोकरीचे कंत्राट संपले असले तरी त्यांना आगामी काळात आणि इतर नोकर भरतीवेळी सामावून घेण्यासाठी प्राधान्य दिले जाणार असल्याचे टोपे यांनी यावेळी जाहीर केले.