नोकरभरती आणि पदोन्नतीची मागणी मान्य, मंत्रिमंडळ बैठकीनंतर उर्जामंत्री राऊत यांची माहिती

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी (दि. 20) झालेल्या बैठकीत अनेक मंत्र्यांनी राज्यातील रखडलेली नोकरभरती आणि पदोन्नतीची मागणी केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्यातील नोकरभरती आणि पदोन्नतीबाबत लवकरच मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनीही मंत्रिमंडळ बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना यावर भाष्य केले आहे.

उर्जामंत्री राऊत म्हणाले की, नोकर भरतीबाबत मी देखील मागणी केली. गृहखात्याने नोकर भरतीचे परिपत्रक काढले आहे, तसेच सामान्य प्रशासन विभागाच परिपत्रक काढावे आणि त्यानुसार नोकर भरती केली जावी, अशी विनंती केली आहे. ती विनंती मान्य झाली आहे. कोरोनामुळे आणि SEBC आरक्षणाला स्थगिती असल्याने रखडलेली नोकरभरती पुन्हा सुरू करावी, अशी अनेक मंत्र्याने मागणी केली. काही तांत्रिक बाबी दूर करून नोकरभरती करता येईल का याची चाचपणी सरकारकडून केली जाणार आहे. त्यानंतर नोकरभरती सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

1) कापसाचे चुकारे शेतकऱ्यांना देण्यासाठी कापूस पणन महासंघाला बँकाकडून कर्ज घेण्यास 1500 कोटीची शासन हमी.

2) राज्यात शिक्षण पद्धतीचे अध्यापन, अध्ययन व परिणाम याचे बळकटीकरण कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचा निर्णय.

3) खासगी बँकांना शासकीय बँकिंग व्यवहार हाताळण्यास मान्यता.