Good News ! राज्यात 6 हजार शिक्षक भरतीला सरकारकडून हिरवा कंदील

मुंबई : ठाकरे सरकारने शिक्षकांच्या संदर्भातील एक अतिशय महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने 6 हजार शिक्षक भरतीला मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे भरतीच्या प्रतिक्षेत असलेल्या शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ही भरती प्रक्रिया पवित्र पोर्टल पद्धतीने होणार आहे.

अनेक कारणांमुळे रखडलेल्या शिक्षक भरतीची प्रतिक्षा हजारो शिक्षक मागील दोन वर्षांपासून करत होते. आता त्यांची प्रतिक्षा संपली आहे. शिक्षक भरती घ्यावी, यामागणी साठी राज्यात अनेक ठिकाणी आंदोलने झाली. शिक्षकांच्या या मागणीवर आता ठाकरे सरकारने निर्णय घेतला असून लवकरच 6 हजार शिक्षकांची भरती घेतली जाईल.

80 हजार युवकांना रोजगार
दरम्यान, मंत्री नवाब मलिक यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, राज्याच्या कौशल्य विकास विभागामार्फत ऑनलाईन रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून 80 हजार युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात येईल. कंपन्यांची मागणी अधिक असल्यामुळे हा आकडा एक लाखाच्यावरही जाऊ शकतो.

अशी करा ऑनलाइन नोंदणी
नवाब मलिक यांनी सांगितले की, दिनांक 7 ते 12 डिसेंबर 2020 पर्यंत rojgar.mahaswayam.gov.in  आणि yodhaat80.org या दोन संकेतस्थळावर नोकरी देणारे आणि नोकरी हवी असणारे लोक नोंदणी करू शकतात. त्यानंतर 12 आणि 13 डिसेंबर 2020 रोजी ऑनलाइन मुलाखतीच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी दिल्या जातील. 7 डिसेंबरच्या पहिल्याच दिवशी 214 कंपन्यांनी उपक्रमामध्ये नोंदणी केली आहे.