राज्यात लवकरच प्राचार्य, प्राध्यापकांची भरती : मंत्री उदय सामंत

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यश्लोक अहिल्यादेवी विद्यापीठ सोलापूर येथे आलेल्या कार्यक्रमानिमित्त आलेले उच्च तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी अनेक वर्षांपासून रखडलेल्या राज्यातील प्राचार्य, प्राध्यापकांची भरती लवकरच करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, भरतीसंदर्भात आवश्यक माहिती संबंधित महाविद्यालयांकडून मागविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी कुलगुरु मृणालिनी फडणवीस, धनराज माने उपस्थित होते.

उदय सामंत म्हणाले, राज्याच्या तिजोरीची स्थिती नाजूक आहे. त्यामुळे शिक्षण विभागच नाहीत तर सर्वच विभागातील भरती प्रक्रिया रखडली आहे. मात्र, शैक्षणिकदृष्टया प्राचार्य, प्राध्यापकांची भरती करणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्यातील महाविद्यालये, विद्यापीठांकडून रिक्त पदांची माहिती मागविली आहे. ती माहिती शासनाला प्राप्त झाल्यानंतर अर्थमंत्री आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन या रिक्त जागा लवकरच भरण्यात येणार आहे.

विद्यापीठातील काही संविधानिक पदांचीही भरती करण्यात येणार असल्याचे सामंत यांनी सांगितले. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात बोलताना सामंत म्हणाले, कर्मचाऱ्यांची सातत्याने मागणी होती ती सातव्या वेतन आयोगाची. ती मागणी मेनी होऊन त्याची अंलबजावनीही झाली आहे. सरकार नेहमीच कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांचा गांभीर्याने विचार करत आहे. कर्मचारी संघटनांनी भेटून कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करण्याची मागणी केली आहे.त्यासाठीही राज्य शासन सकारात्मक असून त्यावर लवकरच निर्णय होईल, असा विश्वासही सामंत यांनी व्यक्त केला.

माझे आणि राज्यपालांचे चांगले जमते
उच्च तंत्र शिक्षणखाते हे राज्यपालांशी निगडीत असल्याने त्यांची माझी सातत्याने भेट होत असते. त्यामुळे कामानिमित्त त्यांच्याकडे माझे जाणे वारंवार होत असते. मी राज्यपालांचा लाडका मंत्री आहे. सांगितलेली कामे तत्काळ होतात. असे सांगतानाच सर्वांसाठी समान नियम असून राज्यपालांनी नियमांचे पालन करायला हवे होते. त्यांच्याकडे पडून असलेल्या १२ आमदारांची फाइल लवकर मंजुरी करून द्यावी असेही मंत्री सामंत यांनी यावेळी सुचविले.