गृहमंत्र्याकडून पोलीस भरतीचा संभ्रम दूर ! दुसर्‍या टप्प्यात आधी शारीरिक चाचणी व नंतर लेखी परीक्षा

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाईन –  राज्यात पोलीस दलात तब्बल 12 हजार 500 पदासाठी जम्बो भरती करण्यात येणार आहे. यात आधी लेखी परीक्षा की शारीरिक चाचणी, असा संभ्रम पोलीस भरतीत सहभागी होणाऱ्या उमेदवारांत निर्माण झाला होता. पहिल्या टप्प्यात आधी लेखी परीक्षा त्यानंतर शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. तर, पोलिस भरतीच्या दुसऱ्या टप्प्यात आधी शारीरिक चाचणी व नंतर लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यवतमाळ जिल्हा दौऱ्यावर आले असताना त्यांनी गुरुवारी (दि. 21) रात्री पत्रकारांशी संवाद साधला. पोलीस दलात मेगा भरती केली जाणार आहे. त्यासाठी गेल्या काही वर्षांपासून ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थी तयारी करत आहेत. 2019 मध्ये निघालेल्या जाहिरातीत आधी लेखी परीक्षा व नंतर शारीरिक चाचणी घेण्याचा निर्णय झाला होता. आतापर्यंत पोलिस भरतीच्या सुरुवातीला आधी शारीरिक चाचणी होत होती. आधी लेखी परीक्षा घेणे म्हणजे उमेदवारांवर अन्याय करण्यासारखे आहे, असा सूर निघत होता. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी मागे पडतील, अशी पुष्टी जोडण्यात येत होती.

पहिल्या टप्प्यात 5 हजार पदासाठी लवकरच भरती प्रक्रिया 2019 च्या अटींप्रमाणे घेण्यात येणार आहे. तर, दुसऱ्या टप्प्यात जवळपास 8 हजार जागांसाठी भरती होणार आहे. त्यात मात्र आधी शारीरिक चाचणी आणि नंतर लेखी परीक्षा घेतली जाणार असल्याचे गृहमंत्री देशमुख यांनी स्पष्ट केले. त्यामुळे उमेदवारांतील संभ्रम दूर झाला आहे.