रेल्वेमध्ये नोकरीच्या आमिषानं 50 जणांना 1 कोटींना फसवलं !
बडोदा : वृत्तसंस्था – गुजरातच्या बडोदा शहर पोलिसांनी नोकरी देण्याच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या रॅकेटने रेल्वे न्यायालयात नोकरी देण्याचे आमिष दाखवून 50 जणांकडून तब्बल 1 कोटी रुपये उकळल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी एसओजी पथकाने तीन लोकांना अटक केली आहे.
तुषार पुरोहित, कुशल पारेश आणि दिलीप सोळंकी असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तुषार पुरोहित हा या टोळीचा म्होरक्या आहे. या टोळीने लोकांकडून कागदपत्रे तयार करण्यासाठी, मुलाखत आणि परीक्षेत पास करण्याच्या नावाखाली एका व्यक्तीमागे 4 ते 5 लाख रुपये उकळले आहेत.
पोलिसांनी सांगितले की, हे रॅकेट बडोदा, सुरत आणि वलसाड परिसरात कार्यरत होते. या भागातील 50 तरुणांना नोकरी देण्याचे आमिष दाखवून त्यांची आर्थिक फसवणूक केली. धक्कादायक म्हणजे गेल्या 14 महिन्यांमध्ये या टोळीला दुसऱ्यांदा अटक करण्यात आली आहे. ही टोळी लोकांना सरकारी नोकरी देण्याचे आश्वासन देत होती. सध्या रेल्वेमध्ये भरती निघाली असून याचा फायदा घेऊन त्यांनी रेल्वेत थेट नोकरी देण्याचे आमिष दाखवले होते. त्यांच्या बतावणीला बळी पडून अनेक तरुणांनी रेल्वेमध्ये नोकरीसाठी अर्ज करत होते आणि या भामट्यांना पैसे देत होते.
तुषार पुरोहित हा परीक्षेचा पेपर सेट करत होता. उमेदवार जाळ्यात सापडला की त्याची मुलाखत घेत होता. एवढेच नाही तर त्यांना रेल्वेचे रबर स्टँप असलेले नियुक्तीपत्रही दिले जात होते. पुरोहित हा कंत्राटी पद्धतीने रेल्वेत नोकरी करत होता. त्यामुळे पोलिसांनी आता रेल्वे अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. पुरोहित हे एकट्यानेच करत होता की यामध्ये कोणत्या रेल्वे अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश आहे का याची तपासणी करण्यात येत आहे.
2019 मध्ये पुरोहितला पोलिसांनी अटक केली होती. त्यावेळी त्याच्याकडून लेटर हेड्स, रेल्वे मंत्रालयाचा लोगो, रबर स्टँप, ओळखपत्र, सर्टिफिकेट आणि लॅपटॉप जप्त केला होता. 2019 मध्ये चार जणांसोबत मिळून हा फसवणुकीचा धंदा सुरु केला होता. पुढील तपास पोलीस करत आहेत.