सावधान ! पुण्यात ‘रेड अलर्ट’, उद्या (8 ऑगस्ट) ‘रेकॉर्डब्रेक’ पाऊस ‘कोसळणार’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यामध्ये मागील दहा दिवसांमध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यातच आता हवामान विभागाने गुरुवारी पुण्यात रेड अलर्ट दिला असून मागील दहा दिवसात जेवढा पाऊस पडला तेवढा पाऊस गुरुवारी पडणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. गुरुवारी एका दिवसात मुख्यत्वे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर पाऊस मोठ्या प्रमाणात कोसळणार आहे. पुण्यामध्ये मागील दहा दिवसात २०० मिलीमीटर पाऊस पडला आहे.

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्याची अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागर अशा दोन्हीही शाखा सक्रिय झाल्या आहेत. त्यामुळे पुढील दोन दिवसांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्याता आहे. त्याच वेळी पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्याचा प्रभाव वाढत आहे. त्याचा थेट परिणाम मध्य महाराष्ट्रावर होत आहे. त्यामुळे या भागात पाऊस वाढत आहे. दक्षिण महाराष्ट्रापासून केरळपर्य़ंत एक कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्याचा परिणाम पुण्यात पाऊस वाढणार आहे.

हवामान घटकाच्या विश्लेषणावरून आज (बुधवार) संध्याकाळपासून ते शुक्रवारी (दि.९) दुपारपर्य़ंत पुणे आणि परिसरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्याता असल्याचे हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

पाण्याचा विसर्ग वाढणार

पानशेत आणि वरसगाव धरणातून अनुक्रमे ९ हजार ८९२ व १३ हजार ७२० क्यूसेक आणि टेमघर धरणातून २ हजार ९४३ क्यूसेक असा विसर्ग नदी पात्रात सोडण्यात आलेला आहे. तीन धरणाचा मिळून २६ हजार ५५५ क्यूसेक पाणी थेट खडकवासला धरणात जमा होणार आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून बुधवारी रात्री ८ वाजता विसर्ग ३५ हजार ५७४ क्यूसेक पर्यंत वाढविण्यात येणार असल्याचे खडकवासला पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले आहे.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like