पुण्यासह ‘या’ 6 जिल्ह्यात Red Alert, अति मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार, येत्या 24 तासात राज्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. कोकणासह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि.22) रायगड, सिंधूदूर्ग, रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करत रेड अलर्ट दिला आहे. सिंधुदुर्गातही अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय पुणे, कोल्हापूर व सातारा येथे मंगळवारी अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच पालघर, मुंबई, ठाणे येथे आज विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यातील इतर जिल्ह्यात देखील कमी-जास्त प्रमाणात पावसाची रिमझिम असणार आहे.

पुढील 24 तासामध्ये दक्षिण कोकण, गोवा भागात मुसळधार पावसाचा अंदाज तर मुंबईसह ठाणे काही भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज मुंबई, ठाणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, पुणे जिल्ह्यात काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तविला आहे. मुंबई-ठाणे, नवी मुंबई आणि उपनगरांध्ये हलक्या स्वरुपाचा पाऊस पडणार आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने पुण्यासह राज्यभरात मान्सून पुन्हा सक्रीय झाला आहे. सोमवारी पुणे शहरात तर दुपारी दोन ते तीनच्या दरम्यान पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. दुसरीकडे खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस बरसू लागल्याने पाटबंधारे विभागाने मुठा नदीपात्रात पुन्हा पाणी सोडण्याची तयारी सुरु केली आहे.