LoC वर रेड अलर्ट, पाकिस्तानी सेना ‘घुसखोरी’साठी वेगवेगळ्या मार्गाच्या तयारीत

श्रीनगर : वृत्तसंस्था – एलओसीच्या पलिकडे काश्मीरच्या काही भागात पाकिस्तानी लष्कराने आपल्या तोफखान्याची पोझीशन बदलण्यासह एसएसजी (स्पेशल स्ट्रायकिंग ग्रुप) च्या युनिट्सना महत्वाच्या ठिकाणी तैनात केले आहे. एसएसजी यूनिटची बॅट (बार्डर अ‍ॅक्शन टीम) हल्ल्याचे नियोजन करते. येत्या काही दिवसात पाकिस्तान एलओसीवर घुसखोरीसह मोठा गोळीबार करण्याची शंका व्यक्त केली जात आहे.

तर दुसरीकडे भारतीय लष्कराने पाक लष्कराच्या या वाढत्या हालचालींची दखल घेऊन एलओसीच्या अनेक भागात अलर्ट घोषित केला आहे. लष्कराने सीमेजवळ राहणार्‍या नागरिकांना सावध राहण्याच्या आणि रात्री बंकर्समध्ये राहण्याचा सल्ला दिला आहे. एवढेच नव्हे तर लष्कराने जवानांनाही सावध राहण्याचा इशारा दिला आहे, जेणेकरून पाकने नापाक हरकत केल्यास वेळीच उत्तर देता येईल.

पाक लष्कराने मागील रविवार ते मंगळवारपर्यंत टंगडार, करनाह आणि गुरेज सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन करून भारतीय लष्कर आणि नागरिकांच्या ठिकाणांवर जोरदार गोळीबार केला होता. यामध्ये एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला आणि चार लोक जखमी झाले. काही घरांचेही नुकसान झाले आहे. भारतीय लष्कराने प्रत्युत्तर देताना नीलम आणि लीपा खोर्‍यातील पाकिस्तानी लष्कराच्या दोन चौक्यांसह एका लाँचिंग पॅडचे नुकसान केले. या कारवाईत पाकिस्तानचे तीन जवान मारले गेले.

सूत्रांनी सांगितले की, जिवित आणि वित्तहानी सोसण्याची क्षमता नसलेल्या पाकिस्तानच्या लष्कराने मागील दोन दिवसात टंगडार सेक्टरसह अन्य अनेक सेक्टरमध्ये आपल्या हालचाली वाढवल्या आहेत. त्यांच्या या हालचाली असामान्य आहेत, कारण त्यांनी त्यांचा तोफखाणा आणि अन्य मोठ्या शस्त्रास्त्रांची पोझीशन बदलली आहे. त्यांनी ज्या पद्धतीने यामध्ये बदल केला आहे, त्यावरून शंका येते की ते येत्या काही दिवसात टंगडार, करनाह, गुरेज आणि अन्य सेक्टरमध्ये भारतीय ठिकाणांवर मोठा गोळीबार करण्याच्या तयारीत आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार हवामानातील बदलासोबत बर्फ विरघळल्यानंतर आता पुढील काही दिवसात उत्तर काश्मीरमध्ये एलओसीवरील घुसखोरांचे नेहमीचे रस्ते हळूहळू खुले होतील. यासाठी पाकिस्तान लष्कर भारतीय ठिकाणांवर गोळीबार करत लष्कराचे लक्ष विचलित करून दहशतवाद्यांना भारतीय परिसरात सुरक्षित घुसखोरी करण्याची संधी देतील. तसेच बॅट आपली कारवाई वेगाने करू शकते.

त्यांनी सांगितले की, पाकिस्तानी लष्कराच्या हालचालींचा आढावा घेतल्यानंतर एलओसीच्या अनेक सेक्टरमध्ये सतर्कता वाढवून सर्व संबंधित लष्करी कमांडर्सना स्थितीला तोंड देण्यासाठी तयार राहण्यास सांगण्यात आले आहे. याशिवाय महत्वाच्या परिसरामध्ये संपूर्ण सावधगिरी बाळगणे, कोणत्याही संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे आणि सर्व सुरक्षा चौक्यांना सावध करणे तसेच गोळीबाराच्या स्थितीत सुरक्षा बंकरमध्ये जाण्यास सांगण्यात आले आहे.