लाल किल्ल्यावरील हिंसाचाराचा मुख्य सूत्रधार ‘दीप सिद्धू’ याच्यासह चौघांचा युध्दपातळीवर शोध, पोलिसांनी जाहीर केलं प्रत्येकी 1 लाखाचं बक्षीस

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनाच्या रोजी शेतकरी ट्रॅक्टर रॅली दरम्यान लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचाराचा मुख्य सूत्रधार दीप सिद्धू याच्यावर दिल्ली पोलिसांनी पकड घट्ट केली आहे. दिल्ली पोलिसांनी दीप सिद्धू, जुगराज सिंह यांच्यासह चार जणांवर एक-एक लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. हे लोक लाल किल्ल्यावर धार्मिक ध्वज फडकावण्यात आणि लोकांना हिंसा करण्यास उद्युक्त करण्यात गुंतले होते.

हिंसाचारात सहभागी असलेल्या इतर चार जणांवर 50-50 हजारांचे बक्षीस

एवढेच नव्हे तर हिंसाचारात सामील झालेल्या इतर चार जणांवर पोलिसांनी 50-50 हजारांचे बक्षीस ठेवले आहे. हिंसाचाराच्या चौकशीसाठी दिल्ली पोलिसांनी सहआयुक्त बीके सिंह यांच्या नेतृत्वात विशेष तपास पथक (SIT) तयार केले आहे. एसआयटी टीममध्ये तीन अन्य डीसीपी जॉय तुर्की, भीषण सिंह आणि मोनिका भारद्वाज यांचा समावेश आहे.

या हिंसाचारानंतर सिद्धू आणि जुगराज बेपत्ता आहेत

विशेष म्हणजे, 26 जानेवारीपासून मुख्य आरोपी दीप सिद्धू, गँगस्टर लक्खा सिधाना आणि लाल किल्ल्यावर झेंडा फडकावणारा जुगराज हे तिघेही बेपत्ता आहेत. मोठी बाब म्हणजे दीप सिद्धू हा सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसिद्ध करत आहे, परंतु अद्यापपर्यंत पोलीस त्याला पकडू शकलेले नाहीत. दिल्ली पोलिसांनी हिंसाचार करणाऱ्या 12 जणांचे फोटोही जारी केले आहेत.

गुन्हे शाखेची 13 पथके करत आहेत तपास

मिळालेल्या माहितीनुसार, आता दीप सिद्धू बिहारमध्ये लपल्याची शंका उपस्थित केली जात आहे. दिल्ली पोलिसांनी तिन्ही आरोपींचा शोध घेण्याचे काम तीव्र केले आहे. या प्रकरणात, गुन्हे शाखेची 13 पथके तपास करीत आहेत. हिंसाचारानंतर आतापर्यंत 14 ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आले असून पोलीस आपली कारवाई करत आहेत. त्याचबरोबर, दोषींना कोणत्याही प्रकारे सोडले जाणार नाही, असा दावा देखील करत आहेत.