भिवंडीतील हनुमान टेकडी परिसरातील ‘त्या’ महिलांचे हात या व्यवसायात गुंतले

भिवंडी : पोलीसनामा ऑनलाइन –  सध्या देशात कोरोना संसर्गाने थैमान घातलं आहे. त्याचं पार्श्वभूमीवरती भारतात लॉकडाऊन पुकारण्यात आले. याच लॉकडाऊन च्या काळात छोट्या – छोट्या व्यवसायांवर याचा मोठा परिणाम झालेला दिसून आला. कोरोना संसर्गामुळे वेश्या व्यवसायावर देखील परिणाम होऊन व्यवसाय करणाऱ्या महिलांवर उपासमारीची वेळ आली. मात्र, शहरातील वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांची वस्ती असलेला हनुमान टेकडी परिसर म्हणजे जणू काही बदनाम वस्ती. या बदनाम वस्तीत नेहमी गिऱ्हाईकाच्या शोधात भिरभिरणाऱ्या नजरांची खुणावणारे हात आता अगरबत्ती पॅकिंगच्या व्यवसायात गुंतले आहेत.

या महिलांसाठी सामाजिक आरोग्य विषयक काम करणाऱ्या श्री साई संस्थेच्या  प्रमुख स्वाती खान यांच्या पुढाकाराने लॉकडाऊन काळात वेश्या व्यवसाय न करता संसर्ग टाळण्यासाठी निर्धार केला आहे. त्यावेळेस अनेक सामाजिक संस्थाच्या माध्यमातून येथील ५६५ महिलांना वेळोवेळी अन्नधान्य, इतर जीवनावश्यक गोष्टीचें वाटप करण्यात आले. मात्र, लॉकडाऊनचा कालावधी वाढत गेला तसा येथील महिलांची तगमग वाढली. दोन वेळचं जेवण मिळतं पण इतर खर्चासाठी, घरभाडे यासाठी कोणाकडे हात पसरणार. या वेदनेतून महिलांनी आम्हाला काम पाहिजे, या साठी तगादा लावला होता. दरम्यान, श्री साई सेवा संस्थेच्या संचालिका स्वाती खान यांनी तहसीलदार व उद्योगपती यांच्या माध्यमातून या महिलांना मिळवून देण्यासाठी चंग बांधला. त्यांच्या या प्रयत्नाला यश सुद्धा आले आणि येथील महिलांना अगरबत्ती पॅकिंग करण्याचे काम मिळाले.

यातील काम करण्यास उत्सुक असलेल्या निवडक २५ महिलांना प्रथम या साठी निवड करुन त्यांना १५ दिवसांचे प्रक्षिशण देण्यात आलं. त्यांचे काम समाधानकारक राहिल्यास अगरबत्ती पॅकिंगचे काम निरंतर सुरु राहणार असल्याचं सांगितलं. या प्रशिक्षण कालावधीत महिलांना २१० रुपये प्रतिदिन मानधन स्वरुपात दिलं जाणार असून, सायंकाळच्या सुमारास महिलांना हळद दूध व उकडलेले अंडे असा पौष्टिक आहार दिला जातो. लॉकडाऊनच्या काळात आम्हाला संस्थेंच्या माध्यमातून अन्नधान्य मुबलक स्वरुपात मिळाले, पण या कामाने आमची पैशांची नड दूर झाली.

तसेच या महिलांसोबत त्यांच्या मुलांना सुद्धा स्वयंरोजगार करता यावा, यासाठी सध्या चायना लायटिंगला विरोध होत असल्याने त्यांना लायटिंग तोरण, दिवे बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. दरम्यान, हे काम असेच निरंतर सुरु राहिले तर आपण वेश्या व्यवसायातून बाहेर पडू, असा विश्वास या महिलांनी व्यक्त केला आहे.