लाल कांदा 2300 रुपयांनी तर उन्हाळ कांदा 1100 रुपयांनी कोसळला, भाव कोसळताच काही काळ कांदा लिलाव ठप्प

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन –(राकेश बोरा)  :  कांदा भाव पाडण्यासाठी केंद्र शासनाने दि २४ रोजी कांदा साठवणुकीवर निर्बंध आणताच आज लासलगाव येथील मुख्य बाजार समितीत लाल कांदा २३०० रुपये तर उन्हाळ कांदा ११०० रुपयांनी कोसळला. आज भाव कोसळताच महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे भारत दिघोळे आक्रमक होत शेतकरी वर्गासह एकत्र येत एका दिवसात मोठी कांदा बाजार भावात घसरण झाल्याने कांदा उत्पादकांनी लासलगाव बाजार समितीत कांद्याचे लिलाव बंद पाडत कांद्यावरील सर्व निर्बंध मागे घ्यावा अन्यथा या पेक्षाही मोठे आंदोलन करण्याचा इशारा भारत दिघोळे यांनी दिला आहे.

आज उन्हाळ कांद्याला जास्तीतजास्त ५८०० रुपये, सरासरी ५३०० रुपये तर कमीतकमी १५०० रुपये मिळाला आहे.तर लाल कांद्याला जास्तीत जास्त ४२०१,सरासरी ३७०१ तर कमीत कमी १४०१ रुपये भाव मिळाले.मोदी सरकारने कांदा निर्यात बंदी, आयातीसाठी प्रोत्साहन, कांदा साठवणुकीवर मर्यादा या कारणांमुळे कांदा भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

केंद्राने अवघ्या २५ टनापर्यंत कांद्याला साठवणीकरता परवानगी दिली आहे, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. कांद्याचे भाव वाढल्यामुळे साठवणुकीवर मर्यादा घालण्यात आली आहे. देशातील बर्याच भागात जोरदार परतीचा पाऊस कोसळत आहे. त्यामुळे कांदासुद्धा येत्या काळात सर्वसामान्यांच्या डोळ्यांत पाणी आणणार आहे. जर कांद्याचे भाव सध्याच्या गतीने वाढत राहिले तर यंदा दिवाळीत कांद्याचे दर खूपच भडकू शकतात. मागील काही दिवसांपासून मेट्रो शहरात १०० ते १२० रुपये प्रति किलोने किरकोळ कांदा विकला जात आहे.

आयातीला परवानगी दिल्याने भाव पडण्याची शक्यता

गेल्या काही दिवसात मेट्रो भागात कांद्याचे भाव २० रुपयांवरून १२० रुपयांच्या जवळपास पोहोचला आहे.त्यामुळे हा निर्णय घेतला तसेच आयातीवरच्या कांद्याला लागणारी इन्स्पेक्शन फी देखील माफ करण्यात आली आहे. दुसऱ्या देशातून आयातीला परवानगी दिल्यामुळे भाव पडण्याची शक्यता आहे. मग कांदा जीवनावश्यक यादीतून वगळून केंद्र सरकारनं नेमकं काय साध्य केलं? असा प्रश्न सध्या उपस्थितीत करण्यात येत आहे. भाव वाढले की आधी निर्यात बंदी केली. त्यातूनही भाव वाढले तर आयातीला परवानगी दिली. यामुळं इथल्या शेतकऱ्याच्या कांद्याचं करायचं तरी काय? असा सवाल शेतकरी करत आहेत

कांद्याचे दर फेब्रुवारीपर्यंत खाली येणार नाहीत?

महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात आणि कर्नाटकमध्ये कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नवीन पीक फेब्रुवारीमध्ये येईल, तोपर्यंत कांद्याचे दर खाली जाण्याची चिन्हे दिसत नाहीत. कांद्याच्या दरात वाढ होण्याचे एक कारण म्हणजे हॉटेल आणि ढाबे सुरू करणे. त्यामुळे कांद्याची मागणीही वाढली असून, कांदा महाग होत आहे