स्वत:ला प्राऊड भारतीय म्हणविणा-या तरुणीचा मुस्लिम प्रतिनिधीशी बोलण्यास नकार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

पूजा सिंह नावाच्या एका तरुणीचे वादग्रस्त ट्विट सोशल मीडियावर चांगलंच चर्चिले जातेय. एका मोबाईल कंपनीची तक्रार सोशल मीडियाच्या माध्यमातून कंपनीपर्यंत पोहचवणा-या पूजाने ट्विटरवर कंपनीच्या एका मुस्लिम प्रतिनिधीशी बोलण्यास नकार दिला. इतकंच नाही तर तिनं आपल्याला कंपनीने हिंदू प्रतिनिधी उपलब्ध करून द्यावा अशीही मागणी केली. त्यानंतर कंपनीच्या एका हिंदू प्रतिनिधिनं पूजाला उत्तर दिले.  त्यानंतर जाती-धर्मावरून भेदभाव करणा-या लोकांना प्रोत्साहन दिल्यावरून कंपनीवरही टीका झाली.

पूजा सिंह हिच्या ट्विटर हॅन्डलवरून मिळालेल्या माहितीनुसार, ती लखनऊची रहिवासी आहे. आणि एका मॅनेजमेंट कंपनीत नोकरीला आहे. ती स्वत:ला प्राऊड भारतीय, प्राऊड हिंदू आणि सेनेवर प्रेम करणारी असल्याचे सांगते.

पूजाने सोमवारी एअरटेल कंपनीला एक ट्विट करत म्हटले ‘एअरटेल तुमची डीटीएच कस्टमर सर्व्हिस खराब आहे. मी डीटीएचशी निगडीत एक तक्रार नोंदवली. परंतु, सर्व्हिस इंजिनिअरने माझ्याशी चुकीचे वर्तन केले़  त्याचे शब्द होते – तू फोन ठेव, परत कॉल करू नको. अशा पद्धतीनं एअरटेल आपल्या उपभोक्त्यांना लुटतेय’.

पूजाच्या या ट्विटवर कंपनीच्या एका प्रतिनिधीनं उत्तर दिले़ ‘आम्ही लवकरच या तक्रारीसंबंधी चर्चा करू – शोएब’ शोएबने कंपनीच्या नियमानुसार आपले नाव ट्विटमध्ये नोंदवले होते. पण यावर मात्र पूजाने मुस्लिम प्रतिनिधीशी बोलण्यास नकार दिला. ‘प्रिय शोएब, तुम्ही मुस्लिम आहात आणि मला तुमच्या कामाच्या नैतिकतेवर भरवसा नाही कारण उपभोक्त्यांच्या सेवेसाठी कुराणात वेगळ्या गोष्टी असू शकतात. म्हणून माझी एअरटेलकडे मागणी आहे की मला एक हिंदू प्रतिनिधी उपलब्ध करून द्यावा’

यानंतर एअरटेलच्या आणखीन एका प्रतिनिधीनं ट्विट केलं… ‘पूजा तुमच्याशी जसे बोलणं झाले, त्यानुसार तुम्ही चर्चेसाठी तुमची योग्य वेळ सांगा, आम्हाला तुमची मदत करण्यासाठी तुमचा फोन नंबर शेअर करा, गगनजोत’ एअरटेल कंपनीच्या प्रतिनिधीचे हे उत्तर वाचल्यानंतर सोशल मिडियावर वाद रंगला. सोशल मीडियावर लोकांनी ‘पूजाने मुस्लिम प्रतिनिधीशी बोलण्यास नकार दिल्याने  एअरटेलने हिंदू प्रतिनिधी उपलब्ध केला’ असं म्हणत कंपनीवर जोरदार टीका केली. त्यातच जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट करत ‘एअरटेल मी माझ्या टाईमलाइनवर संपूर्ण चर्चा वाचली. मी आता कंपनीला एक रुपयाही देणार नाही. मी माझा नंबर पोर्ट करतोय. सोबतच डीटीएच आणि ब्रॉडबॅन्ड सुविधाही बंद करतोय’ असे ट्विट करत त्यांनी आपला निषेध नोंदवला.