मुंबई पोलिस आयुक्तांची बदली करणार ? मुख्यमंत्र्यांची महत्वाच्या मंत्र्यांसोबत बैठक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आज सकाळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला बैठकीला महाविकास आघाडी सरकारमधील महत्त्वाचे मंत्री उपस्थित होते. या बैठकीत निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे आणि पोलीस आयुक्तांच्या बदली संदर्भात चर्चा झाल्याचे समजत आहे. सुमारे दीड तास हि बैठक सुरु होती.

या बैठकीमध्ये गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे प्रकरणाची सविस्तर माहिती बाकी मंत्र्यांना दिल्याचे समजत आहे. सचिन वाझेना एनआयएकडून झालेली अटक, मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू एकूणच या सर्व प्रकरणामध्ये सरकारची प्रतिमा खराब होत चालली आहे. सचिन वाझे प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांची भूमिका काय होती? त्याची सरकारला झळ बसेल का? या सर्व मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे समजत आहे.

या बैठकीनंतर या प्रकरणाशी संबंधीत सरकारची काय भूमिका असेल ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्या भेटीवरून अनेक चर्चा रंगू लागल्या होत्या. त्यामध्ये गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याच्या चर्चा सर्वत्र चालू झाल्या होत्या. या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे नेते आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कुठलाही राजीनामा घेणार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला.