भाऊ कदमसह इतरांवर गुन्हा दाखल करा !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – विनोदी अभिनेता भाऊ कदम यांच्या नशीबवान चित्रपटामागील साडेसाती सुटत नाहीय. सुरुवातीला चित्रपटाला चित्रपटगृह मिळत नव्हते. आता या चित्रपटावर नवीन संकट आले आहे. या सिनेमावर मुंबई महापालिकेच्या सफाई कामगार संघटनेने आक्षेप घेतला आहे. इतकंच नाही तर चित्रपटाशी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

‘नशीबवान’ या चित्रपटात सफाई कामगारांबाबत अपमानास्पद चित्रण केले आहे, असा आरोप स्वतंत्र म्युनिसिपल कामगार संघटनेने केला आहे. त्यामुळे कामगारांची प्रतिमा मलिन होत आहे. त्यामुळे या सिनेमाचं प्रदर्शन थांबवण्यात यावे, अशी मागणी या संघटनेनी केली आहे.

जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलिसांचीही प्रतिमा मलिन केली आहे, असा दावा सफाई कामगार संघटनेने केला आहे. त्यामुळे या सिनेमाचे निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकरांविरोधात गुन्हा दाखल करा, या सिनेमाचं प्रदर्शन रोखा, अशी मागणी स्वतंत्र म्युनिसिपल कामगार युनियनने केली आहे.

दरम्यान, नशीबवान चित्रपटाला चित्रपटगृहात जागा म्हणजे स्क्रिन न मिळाल्याने भाऊ कदम यांनी त्यांच्या फेसबुकवरून त्यावर पोस्ट लिहीली होती. त्यात परभाषीय चित्रपटांसमोर आपल्या मराठी चित्रपटाला महाराष्ट्रातच चित्रपटगृहातून पायउतार व्हावं लागतं, असं लिहत याबद्दल खंत व्यक्त केली होती.