नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाचे कामकाज सलग दुसऱ्या दिवशी विस्कळीत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाचे कामकाज सलग दुसऱ्या दिवशी विस्कळीत झाले आहे. याचा फटका दस्त नोंदणी करता आलेल्या नागरिकांना बसला आहे.

तांत्रिक अडचणीमुळे सर्वर बंद पडल्याचे विभागाकडून सांगण्यात येत आहे. मंगळवारी दस्त नोंदणीचे काम न झालेले काही नागरिक दस्त नोंदणीसाठी बुधवारी सकाळी नोंदणी आणि मुद्रांक शुल्क कार्यालयात आले. सलग दुसऱ्या दिवशी सर्वर बंद असल्यामुळे दस्त नोंदणीचे काम होऊ शकत नाही असे समजल्यानंतर त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागला. त्यापैकी एक लष्करी अधिकारी असून त्याची नियुक्ती चीन येथील प्रशिक्षणासाठी केली गेली आहे. तो अधिकारी दस्त नोंदणी करण्यासाठी आला तेव्हा सर्वर बंद असल्याचे त्यांना समजले. काल देखील हा अधिकारी कार्यालयात आला होता. परंतु दस्तनोंदणी होऊ शकली नव्हती. उद्या त्याला नियोजित वेळेनुसार सेवेत दाखल व्हायचे आहे. आजचा एकच दिवस त्यांच्या हाती दस्त नोंदणीसाठी होता. परंतु नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाच्या निष्काळजीपणाचा फटका त्यांना बसला.

हे ही वाचा – ८० हजाराची लाच घेणारा पोलीस निरीक्षक अँटी करप्शनच्या जाळ्यात 

त्याचप्रमाणे आणखी एका नागरिकाला कतार या देशात जायचे आहे. हा नागरिक दस्त नोंदणीसाठी आज देखील आला होता. त्याचीही दस्त नोंदणी झाली नाही. आज दुपारी विमानाने त्यांना कतारला जायचे आहे. दस्त नोंदणी झाली नसल्याने त्यांची ही अडचण झाली आहे. विमानाचे तिकीट नॉन रिफंडेबल असल्याने नोंदणी न करता जावे लागेल अशी स्थिती निर्माण झाली.

याबाबत अ‍ॅडवोकेट अमोल काजळे पाटील यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले, ” गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने तांत्रिक अडचणीमुळे दस्त नोंदणीचे कामात अडथळे येत आहेत. या विभागाचा सर्वर बंद असेल, तांत्रिक अडचणी असतील त्यावेळी त्यांनी नागरिकांना दस्त नोंदणीसाठी बोलावू नये. नागरिकांना फुकट हेलपाटा मारावा लागतो. ऑनलाइन काम बंद झाले असेल तर ऑफलाइन पद्धतीने कामकाज पूर्ण करून घ्यावे किंवा दस्त नोंदणीसाठी आणखीन काही वेगळा पर्याय करता येईल का याचाही विचार विभागाने केला पाहिजे .”