गणेश भक्तांनो विसर्जनासाठी संकेतस्थळावर नोंदणी बंधनकारक !

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गिरगाव चौपाटीवरील विसर्जनासाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने नियोजन केले आहे. गणेश विसर्जनासाठी ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे. त्यामध्ये वेळ, विसर्जनाचे ठिकाण, तारीख नोंदवावे लागणार आहे. नोंदणीनुसार विसर्जनासाठी पालिकेकडून भाविकांना वेळ देण्यात येणार आहे.

कोरोनामुळे समुद्रकिनारा आणि कृत्रिम तलावांवर गर्दी होऊ नये यासाठी ग्रॅन्टरोड येथील पालिकेच्या ‘डी’ विभाग कार्यालयाने ऑनलाइन विसर्जनासाठी नोंदणी करण्याची योजना आखली आहे. या परिसरातील कृत्रिम तलाव अथवा गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जन करण्यास इच्छुक असलेल्या भाविकांना विसर्जनासाठी संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे. संकेतस्थळावर गणेश विसर्जनाची तारीख, वेळ, ठिकाण आदी माहिती नोंदवावी लागणार आहे. हे संकेतस्थळ कार्यान्वित करण्यात आले. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि घरगुती गणपतीच्या विसर्जनासाठी नोंदणी बंधनकारक आहे. गणेश विसर्जनासाठी एस. एम. जोशी क्रीडांगण, ऑगस्ट क्रांती मैदान, गिल्डर लेन वसाहत, बाणगंगा, बीआयटी चाळ मैदान (मुंबई सेंट्रल), बॉडीगार्ड लेन आरटीओ आणि गिरगाव चौपाटी या ठिकाणांचा पर्याय संकेतस्थळावर आहे. गणेश विसर्जनासाठी निश्चित झालेल्या वेळेपूर्वी अर्धा तास आधी भाविकांना विसर्जनस्थळी पोहोचावे लागणार आहे. गणेश विसर्जनानंतर भाविकांना तेथे थांबता येणार नाही. पालिकेच्या या योजनेमुळे गर्दी टाळता येईल आणि पोलिसांवरचा ताण हालका होऊ शकेल, असा विश्वास ‘डी’ विभाग कार्यालयाचे साहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी व्यक्त केला.