ग्राहकांसाठी खुशखबर! ORIGINAL हापूसला जीआय मानांकन

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाईन – हिवाळा संपल्यानंतर चाहूल लागते ती उन्हाळ्याची आणि विशेष म्हणजे हापूस आंब्यांची. पण खऱ्या रत्नागिरी हापूस आंब्यांच्या नावाखाली अनेकदा फसवणूक केली जाते. पण या सगळ्याला आळा बसण्यासाठी कोकणातील हापूस आंब्याला ‘जीआय’ मानांकन मिळाले आहे. त्यामुळे यापुढील काळात हापूस विक्रीसाठी मानांकन प्राप्त संस्थांकडे नोंदणी करणे बंधनकारक असणार आहे. नोंदणी न करताच नाव वापरल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाईचा बडगा उचलला जाणार असल्याचे या संस्थांनी स्पष्ट केले आहे.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली, कोकण हापूस आंबा उत्पादक आणि विक्रेते सहकार संस्था रत्नागिरी, देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्था मर्यादित जामसंडे आणि केळशी परिसर आंबा उत्पादक सहकारी संस्था केळशी(दापोली) या ४ संस्थांना जीआय’ मानांकन मिळाले आहे. यापुढे सर्वच आंबा उत्पादक आणि विक्रेत्या शेतकऱ्यांना अधिकृतरीत्या हापूसची या संस्थांकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. या संस्थांकडे नोंदणी न करता हापूसचे नाव वापरल्यास त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचलला जाणार असल्याचे ज्येष्ठ आंबा उत्पादक डॉ. विवेक भिडे यांनी स्पष्ट केले आहे. पालघर, रत्नागिरी , देवगड , सिंधुदुर्ग , दापोली या पाच जिल्ह्यांना हापूस नाव वापरता येणार आहेत.

कसा ओळखणार खरा हापूस

–नोंदणी केलेल्या आंबा उत्पादकांनाच बॉक्स आणि पेटीवर हापूस म्हणून नोंद करता येणार आहे.
–विक्रेता आणि प्रक्रिया उद्योगांनाही या संस्थांकडे नोंदणी करावी लागणार आहे.
–येत्या वर्षभरामध्ये यासाठी विशेष स्टिकर्सचे वाटपही करण्यात येणार आहे. असे डॉ. विवेक भिडे यांनी सांगितले.

दहा वर्षाच्या प्रदीर्घ लढाईनंतर कोकणच्या हापूसला ऑक्टोंबर महिन्यात जीआय मानांकन मिळाले होते. ३ ऑक्टोबरला कोकण कृषी विद्यापीठाच्या नावाने हापूसला जीआय मानांकन प्रमाणपत्र देण्यात आले. यापूर्वी ३२३ जीआय मानांकन प्रमाणपत्र भारत सरकारतर्फे देण्यात आली आहेत. यात कोकणच्या हापूसचा ३२४वा क्रमांक आहे. कोकणातून येणारा हापूस लवकरच जीआय मानांकनाच्या लोगोसह बाजारात येण शक्य होणार आहे.

जीआय मानांकन म्हणजे काय?

विशिष्ट ठिकाणातील माती, पाणी आणि वातावरणामुळे, तसेच शेतकऱ्यांच्या व्यवस्थापन कौशल्यातून शेतीमालास रंग, वास, चव, आकार आदी गुणवैशिष्ट्यांमध्ये वेगळेपण लाभते. यावर शिक्कामोर्तब ‘जीआय’ अर्थात ‘भौगोलिक निर्देशन’ मानांकनातून मिळते.