राज्यात द्राक्ष बाग नोंदणीस प्रारंभ, आतापर्यंत राज्यातून 14 हजार 733 प्लॉटची नोंदणी 

लासलगाव – द्राक्ष निर्यातीला चालना देण्यासाठी तसेच युरोपियन देशांत होणाऱ्या निर्यातीकरिता रासायनिक अंशमुक्त द्राक्षाच्या निर्यातीसाठी ‘अपेडा’च्या ‘ग्रेपनेट’ प्रणालीअंतर्गत नोंदणी करण्यात येते. २०२०-२१च्या हंगामाकरिता निर्यातक्षम द्राक्ष बागांची नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. या हंगामासाठी २५ नोव्हेंबर पर्यंत राज्यातून १४ हजार ७३३ प्लॉटची नोंदणी झाली असून या पैकी १२ हजार ९९३ प्लॉटची नोंदणी एकट्या नाशिक जिल्ह्यातून झाली आहे.

शेतकरी वर्गाने कृषी विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयाशी संपर्क साधून विहित मुदतीत नोंदणी तसेच नूतनीकरण करण्याचे आवाहन फलोत्पादन विभागाकडून करण्यात आले आहे.आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चवीमुळे अख्या जगामध्ये भुरळ पाडणाऱ्या द्राक्ष निर्यातीला मागील वर्षी अवकाळी चा मोठा फटका बसल्याने द्राक्ष उत्पादनाचे गणित विस्कटले होते.

द्राक्ष हे देशाला मोठय़ा प्रमाणात परकीय चलन मिळवून देणारे फळ आहे.सन २०१९-२० हंगामात तब्बल १ लाख ९३ हजार मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात झाली होती. त्यातून २१७६ कोटींहून अधिकचे परकीय चलन देशाला मिळाले. कृषिमाल निर्यात करताना प्रत्येक देशाच्या द्राक्ष-मण्यांचा आकार, द्राक्ष-घडाचे वजन, साखरेचे प्रमाण आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कीटकनाशकांचे अंश आदींवर आधारित काही निकष आहेत. या निकषांचे पालन करीत भारतीय द्राक्षांनी युरोपीय देशांत आपली ओळख निर्माण केली.

गेल्या पाच वर्षांत झालेली द्राक्ष बागांची नोंदणी
२०१४-१५    २८,०००
२०१५-१६    २९,०००
२०१६-१७    ३२,०००
२०१७-१८    ३८,०००
२०१८-१९    ४३,१७२
२०१९-२०    ३२,५९२
२०२०-२१    १४७३३ ( २५ नोव्हेंबर)

You might also like