पुणे जिल्ह्यासोबत शहरात दुय्यम निबंधकांना हाताशी धरत ‘रेरा’ कायद्याचे उल्लंघन करून सर्वाधिक दस्त नोंदणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे जिल्ह्यासोबत शहरात दुय्यम निबंधकांना हाताशी धरत ‘रेरा’ कायद्याचे उल्लंघन करून सर्वाधिक दस्त नोंदणी झाल्याचे समोर आले आहे. या संबंधीच्या तक्रारी राज्य सरकारकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार राज्य सरकारने पुण्यातील ‘रेरा’ कायद्याचे उल्लंघन करून दस्त नोंदणी करण्यात आलेल्या सर्व व्यवहारांची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र चौकशी पथक नेमले आहे. या पथकाला चौकशी करून एक महिन्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

सर्वसामान्य नागरिकांची बांधकाम व्यावसायिकांकडून फसवणूक होऊ नये म्हणून राज्यात ‘रेरा’ कायदा लागू करण्यात आला. मात्र, तरीही पुण्यातील दुय्यम निबंधक कार्यालय हवेली-३ (मगरपट्टा-हडपसर) येथे दररोज हजारो बोगस दस्त नोंदणी होत असल्याच्या तक्रारी राज्य सरकारकडे करण्यात आल्या. पुण्यात बाणेर, हडपसर सोबत पीएमआरडीएच्या हद्दीत अलीकडे मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायत असलेल्या, रेरा कायद्याचे उल्लंघन केलेल्या आणि गुंठेवारीला बंदी असताना सर्रास बोगस दस्त नोंदणी केली जात असल्याच्या तक्रारी राज्य सरकारकडे प्राप्त झाल्या असून, त्यानुसार ही चौकशी समिती नियुक्त करण्यात येत असल्याचे राज्य सरकारने आपल्या आदेशात म्हटलं.

“रेरा कायद्याचे उल्लंघन करून दस्त नोंदणी झाल्याबाबतच्या प्राप्त झालेल्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर दुय्यम निबंधक, हवेली क्र. ३ या कार्यालयाबरोबर पुणे शहरातील इतर दुय्यम कार्यलयात दस्त नोंदणीची कार्यवाही पार पडली जाते ? यासंदर्भात प्रत्यक्ष तपासणी करण्यासाठी तपासणी पथक नियुक्त करण्यात आले आहे. तपासणी पथकाने आपला अहवाल नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे या कार्यालयामार्फत राज्य सरकारसमोर दि. १-१२-२०२० पूर्वी सादर करावा,” असे राज्य सरकारने काढलेल्या आदेशात सांगितलं आहे.

चौकशी समितीत हे सदस्य

>> गोविंद कराड, नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक, लातूर विभाग
>> भरत गरुड, प्रभारी, नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक (मुख्यालय)
>> विजय भालेराय, सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, जळगाव
>> उदयराज चव्हाण, सह जिल्हा निबंधक, मुंबई शहर

You might also like