रुग्णालयांकडून लसीचे Booking , 858 रुग्णालयांनी केली मागणी

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन – जगभरात लाखो लोकांचा बळी घेतलेल्या कोरोनावर कधी लस उपलब्ध होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण आता लवकरच नूतन वर्षारंभी कोरोना लस ( corona-vaccine) उपलब्ध होणार असल्याचे शुभसंकेत मिळाले आहेत. त्यानुसार ही लस कोरोना महामारी थांबविण्यासाठी पहिल्या फळीत कार्यरत असणाऱ्या कोरोना योद्ध्यांना ती प्राधान्याने देण्याचे नियोजन राज्य शासनाने केले आहे. यासाठी जिल्ह्यातील सरकारी, निमसरकारी, खासगी रुग्णालये अशा 1 हजार 258 संस्थापैकी 858 संस्थांनी 31 ऑक्टोबरच्या डेडलाइन म्हणजे शेवटच्या दिवसापर्यंत या कोरोना लसीची (registration-vaccination-hospitals-858) मागणी राज्य शासनाद्वारे केंद्राकडे नोंदविल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

नव्या वर्षाच्या सुरुवातीला लस उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या नियंत्रणात जिल्ह्यातील 858 रुग्णालयांनी त्यांच्या अधिकाऱ्यांसह डाॅक्टर, परिचारिका, वार्डबाॅय आदींसाठी या कोरोना लसीची मागणी नोंदविली आहे. यामध्ये 156 सरकारी रुग्णालय संस्थांपैकी 113 संस्थांनी या लसीची मागणी नोंदविली आहे. तर 1 हजार 78 खासगी संस्थांपैकी 745 वैद्यकीय संस्थांनी तिची मागणी केंद्र शासनाकडे 31 ऑक्टोबरपर्यंत असलेल्या मुदतीत केली आहे.

एका तज्ज्ञ खासगी संस्थेने जिल्ह्यातील या 858 सरकारी, खासगी वैद्यकीय संस्थांची नोंद केलेली आहे. संस्थांना प्राप्त झालेल्या ऑनलाइन लिंकमध्ये या रुग्णालयांच्या पहिल्या फळीतील वैद्यकीय अधिकारी, डाॅक्टर आणि संबंधित कर्मचाऱ्यांच्या संख्येस अनुसरून लसीची मागणी केली आहे. तिची माहिती असलेली लिंक राज्य शासन आणि नंतर थेट केंद्र शासनाकडे सेंड केलेली आहे.

त्यामुळे जिल्ह्यात किती मनुष्यबळाला लस उपलब्ध होणार हे निश्चित सांगता येत नसल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले. मात्र, जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांसह, आरोग्य केंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह सहा महापालिकांची रुग्णालये, दोन नगर परिषदा, जिल्हा परिषद आदींचा आरोग्य विभाग, वैद्यकीय अधिकारी, डाॅक्टर, परिचारिका, वाॅर्डबॉय इत्यादींच्या मनुष्यबळाला ही लस प्राधान्याने देण्याचे नियोजन असल्याचे सूत्रांनी सांगितले.