बनावट मृत्युपत्राच्या आधारे मिळकत हडपण्याचा प्रयत्न, बिल्डर आणि इस्टेट एजंटवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बनावट मृत्यूपत्र तयार करून त्याद्वारे मिळकत हडप करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी बिल्डर, इस्टेट एंजंट, तलाठी यांच्यासह नऊ जणांविरुद्ध विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोर्टाच्या आदेशावरून विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा तपास करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत.

शशिकांत धनाजी कोलते, संतोष धनाजी कोलते, हेमलता धनाजी कोलते, अशोकपाटील बुवा सोनवणे, विलासराव खंडेराव चौधरी, जयमाला अशोक सोनवणे, अनिता विलास चौधरी, संजय मारूत लगण आणि तलाठी भाऊसाहेब अशा नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दत्तात्रय खांदवे यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींवर फसवणुकीसह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल करण्यात आलेल्या बांधकाम व्यसायिक, इस्टेट एजंट यांनी एका महिलेच्या मृत्यूनंतर चार वर्षांनी तलाठी भाऊसाहेब याच्या मदतीने बनावट मृत्यूपत्र तयार करून घेतले. मृत महिलेचे आणि त्यांचे रक्ताचे नाते नसताना देखील त्यांनी तलाठ्याशी हातमिळवणी करून बनावट मृत्यूपत्र तयार करून मिळकत हडपण्याचा प्रयत्न केला. तसेच त्याच्या दप्तरी नोंदी केल्या.

खांदवे यांच्या फिर्यादीनुसार वडिलोपार्जित मिळकत हडप करण्यासाठी संबंधित आरोपी असलेले बांधकाम व्यावसायिक आणि इस्टेट एजंट यांनी प्रयत्न केले. बनावट कागदपत्रे, बनावट मृत्यूपत्र तयार करून शासनाची फसवणूक केली.

फिर्य़ादी यांनी अ‍ॅड. सतिश नायर यांच्यामार्फत न्यायालयात धाव घेतली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.के. खान यांनी विमानतळ पोलिसांना गुन्हा दाखल करून गुन्ह्याचा तपास करण्याचे आदेश दिले. त्यानंतर विमानतळ पोलिसांनी संबंधितांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास विमानतळ पोलीस करीत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –