रेल्वेचा मोठा निर्णय ! ’या’ तारखेपर्यंत नियमित गाड्या धावणार नाहीत, 100% रिफन्ड मिळणार

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने भारतीय रेल्वेने लॉकडाऊन वाढविला आहे. या निर्णयानुसार 12 ऑगस्टपर्यंत पॅसेंजर, मेल एक्स्प्रेस, उपनगरीय रेल्वे गाड्या धावणार नाहीत. ज्या प्रवाशांनी 12 ऑगस्टपर्यंत नियमित ट्रेनचे बुकिंग केले असेल त्यांना 100टक्के परतावा दिला जाणार आहे.

म्हणजेच आता प्रवाशांना नियमित रेल्वेचा प्रवास 12 ऑगस्टपर्यंत करता येणार नाही. मात्र या कालावधीत, 12 मे पासून धावणार्‍या विशेष राजधानी गाड्या आणि 1 जूनपासून धावणार्‍या विशेष मेल, एक्स्प्रेस गाड्या सुरू राहतील. रेल्वे बोर्डाने 13 मे रोजीच्या आदेशात नमूद केले होते की, नियमित गाडीचे बुकिंग 30 जूनपर्यंत रद्द केले आहे. प्रवाशांना पूर्ण परतावा मिळेल. आता रेल्वे रद्द करण्याची तारीख वाढविण्यात आली असल्याने परतावा सुविधाही 12 ऑगस्टपर्यंत केली आहे.

तत्पूर्वी, रेल्वे मंत्रालयाने सोमवारी सर्व परिमंडळांना एक परिपत्रक देऊन 14 एप्रिल रोजी किंवा आधी बुक केलेल्या सर्व तिकिटांचे रिफंड करावे, असे सूचित केले होते. आतापर्यंत रेल्वेने 30 जूनपर्यंत रेल्वे सेवा बंद ठेवण्याची घोषणा केली होती. मात्र, नवीन परिपत्रकानुसार, हे 12 ऑगस्टपर्यंत करण्यात आले आहे.

रेल्वेच्या नियमांनुसार, रेल्वेचे तिकीट कमाल 120 दिवस अगोदर आरक्षित करता येते. आता रेल्वेने 14 एप्रिल आणि त्यापूर्वीच्या सर्व तिकिटांचा परतावा करण्यास सांगितले आहे. म्हणजेच 15 ऑगस्टपूर्वी बुक केलेल्या सर्व तिकिटांचे पैसे परत करण्यात येणार आहेत.

रेल्वेकडून आता मागणी पूर्ण करण्यासाठी ज्या अतिरिक्त गाड्या सुरू आहेत, त्या विशेष गाड्यांच्या श्रेणीत ठेवल्या जातील. सध्या सुमारे 230 मेल आणि एक्सप्रेस गाड्या धावत आहेत, नवीन गाड्या सुद्धा अशाच असतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.