Pune : सर्वसामान्य नागरिकांना दिलासा ! Sassoon Hospital मध्ये नियमित शस्त्रक्रिया सुरू होणार 

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) कोरोनाच्या (Covid-19) काळात बंद असणाऱ्या नियमित शस्त्रक्रिया टप्प्याटप्प्यानं सुरू केल्या जाणार आहेत. कोरोना रुग्णांचा ताण कमी होत असल्यानं रुग्णालय प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे. त्यामुळं सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

लॉकडाऊन (Lockdown) लागू झाल्यानंतर ससून रुग्णालयामधील सर्व शस्त्रक्रिया पुढं ढकलण्यात आल्या होत्या. परंतु आपत्कालीन व आवश्यक शस्त्रक्रिया या काळात सुरू होत्या. हे प्रमाण तुलनेननं खूप कमी होतं. कोविड केंद्रामध्ये एप्रिल महिन्यापासून रुग्ण संख्या वाढू लागल्यानंतर मनुष्यबळाचा तुटवडा निर्माण झाला. त्यामुळं नॉन कोविड (Non-Covid) रुग्णांच्या उपचारावरही परिणाम झाला. परंतु मागील काही दिवसांपासून रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग सुरू केल्यानंतर रुग्णांची गर्दी वाढू लागली आहे. तसंच आता कोरोनाबाधित रुग्णांचा ताणही कमी झाला आहे. त्यामुळं मनुष्यबळ उपलब्ध होत आहे.

लॉकडाऊनच्या आधी रुग्णालयात रोज सुमारे 50 जोखमीच्या तर सुमारे 125 इतर शस्त्रक्रिया (Operation) होत होत्या. सध्या हे प्रमाण अनुक्रमे केवळ 15 व 20 एवढंच आहे. लॉकडाऊन काळात प्रामुख्यानं सिझेरियन, हृदयविकार आदी शस्त्रक्रिया होत्या. अनलॉकमध्ये आता अपघात होऊ लागल्यानं जखमी रुग्णांच्या शस्त्रक्रियांचे प्रमाण वाढत आहे. आता अन्य शस्त्रक्रिया सुरू करण्याच्या सूचनाही विभागांना दिल्या आहेत. या शस्त्रक्रिया फार दिवस पुढं ढकलता येणार नाहीत. परंतु त्यात एकदम वाढ केली जाणार नाही. टप्प्याटप्प्यानं या शस्त्रक्रिया सुरू होतील. सध्या कोरोनाचे रुग्ण कमी असले तरी अचानक वाढ झाल्यास त्यावर परिणाम व्हायला नको. म्हणून ही दक्षता घेतली जाणार आहे.

लॉकडाऊन लागू झाल्यानंतर ससून रुग्णालयामधील बहुतेक सर्व शस्त्रक्रिया पुढं ढकलण्यात आल्या होत्या. परंतु आपत्कालीन व आवश्यक शस्त्रक्रिया या काळात सुरू होत्या. आता कोरोनाबाधित रुग्णांचा ताणही कमी झाला आहे. मनुष्यबळही उपलब्ध होत आहे. त्यामुळं आता लॉकडाऊन काळात थांबवण्यात आलेल्या शस्त्रक्रिया टप्प्याटप्प्यानं सुरू करणार आहोत अशी माहिती एस चोकलिंगम (विशेष कार्यकारी अधिकारी, ससून रुग्णालय व जमाबंदी आयुक्त) यांनी दिली.