रेखा जरे हत्याकांड प्रकरण : पत्रकार बाळ बोठेच्या बंगल्याची झडती, रिव्हॉल्व्हर जप्त

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – सामाजिक कार्यकर्त्या आणि यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याच्या घराची शुक्रवारी पोलिसांनी झडती घेतली. यावेळी बोठे याचे रिव्हॉल्व्हर आणि इतर काही वस्तू जप्त केल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले आहे. जरे यांच्या हत्याकांडाचा उलगडा होताच बोठे फरार झाला होता. तो परदेशात पळून जाऊ नये, म्हणून यासाठी पोलिसांनी विमानतळ व्यवस्थापनांना बोठे याच्याबाबतची लुकआउट नोटीस जारी केली आहे. त्यामुळे त्याचा परदेशात पळून जाण्याचा मार्ग बंद झाला आहे.

अहमदनगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाट परिसरात रेखा जरे यांची 30 नोव्हेंबर रोजी रात्री हत्या झाली होती. या हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत पाच आरोपींना अटक केली आहे. या आरोपींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे या हत्येची सुपारी बोठे आणि सागर भिंगारदिवे यांनी दिल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

यातील भिंगारदिवे याला अटक झाली असून, बोठे मात्र फरार झाला होता. फरार होताना त्याने त्याचे मोबाईल घरीच ठेवले होते. पोलिसांनी मोबाईल जप्त केले असून, बोठे याच्या शोधासाठी विविध ठिकाणी 5 पोलीस पथके रवाना केली आहेत. शुक्रवारी दुपारी तपासी अधिकारी अजित पाटील यांच्या आणि एलसीबीच्या पथकाने बोठे याच्या नगर शहरातील बालिकाश्रम रोडवरील जिद्द या बंगल्याची झडती घेतली.

यावेळी पोलिसांना बाळ बोठे याचे रिव्हॉल्व्हर आढळून आले आहे. बाळ बोठे याच्याकडे शस्त्र परवाना आहे, तसेच तपासात महत्त्वपूर्ण ठरतील अशा काही वस्तूही पोलिसांच्या झडतीत आढळल्या आहेत.

बोठेच्या मुसक्या आवळणार; चौफेर शोध सुरू
हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार बोठे याचा पोलिसांकडून चौफेर शोध सुरू आहे. तो कुठे थांबू शकतो? याचा अंदाज घेऊन पोलीस शोध घेताहेत. येणार्‍या काळात गरजेनुसार त्याचे बँक खातेही गोठविले जाणार आहे, असेही सूत्रांनी सांगितले आहे. पसार झाल्यानंतर बोठे याला कोण आश्रय देऊ शकते?, याचीही माहिती पोलीस घेताहेत. त्यामुळे कितीही पळाला तरी पोलीस बोठे याच्या मुसक्या आवळणारच हे निश्चित झाले आहे.

सर्व स्तरातून पोलिसांच्या तपासाचे कौतुक
रेखा जरे यांची हत्या झाल्यानंतर 24 तासांत पोलिसांनी या घटनेचा उलगडा करीत मारेकर्‍यांसह इतर आरोपींना अटक केली आहे. तसेच मुख्य सूत्रधाराचेही नाव समोर आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्वत: या तपासात लक्ष घातले होते. तपासी अधिकारी अजित पाटील आणि स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल ककटे यांच्या पथकानेही परिश्रम घेतले आहे. या गुन्ह्याचा जलदगतीने तपास झाल्याने पोलिसांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

मात्र, रेखा जरे यांच्या हत्येचे कारण अद्यापही गुलदस्तात !
रेखा जरे हत्याकांडात पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली असली तरी सुपारी देऊन ही हत्या का केली?, हे अद्याप गुलदस्तात आहे. जरे यांची हत्या का केली? ही बाब बोठे याला माहीत असल्याचे अटकेत असलेला आरोपी सागर भिंगारदिवे याने पोलिसांना सांगितले आहे. त्यामुळे बोठे याला अटक झाल्यानंतर या हत्याकांडाचा खुलासा होणार आहे.