…म्हणून बाळ बोठेचा घात झाला; नगरचा ‘बीबी’ हैदराबादमध्ये झाला बी.बी. पाटील; मदत करणारी पी. अनंतलक्ष्मी कोण ?

अहमदनगर : रेखा जरे हत्याकांडातील फरार आरोपी बाळ बोठे याच्या मुसक्या आवळण्यात नगर पोलिसांना यश मिळाले आहे. तब्बल 100 दिवस पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी झालेल्या बोठेला एखाद्या थ्रिलर चित्रपटाच्या कथानकाला साजेल अशा पद्धतीने नगर पोलिसांनी हैदराबाद येथे ताब्यात घेतले. दरम्यान, जरे हत्याकांडाच्या रहस्याचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

३० नोव्हेंबर रोजी यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची बोठे याने सुपारी देऊन हत्याकांड घडवून आणले होते. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती. तपासात बोठे याचे नाव समोर येताच तो नगरमधून पसार झाला. पोलिसांनी त्याचा अनेक ठिकाणी शोध घेतला मात्र हाती काहीच लागले नाही. गेल्या तीन महिन्यात पोलिसांनी महाराष्ट्रासह पंजाब, छत्तीसगढ, रायपूर, भोपाळ आदी १०० ठिकाणी बोठेचा शोध घेतला. तो मात्र प्रत्येक वेळी पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी होत होता. त्यामुळे त्याला पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. नगरमधील खास पंटर महेश वसंतराव तनपुरे याच्या संपर्कात बोठे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. शेवटी पोलिसांनी याच तनपुरेवर नजर ठेवून बोठे याचा ठावठिकाणा शोधला. बोठेचा ठावठिकाणा शोधण्यासाठी नगरची सायबर टीम, मोबाइल सेल, मुंबई येथील सायबर पोलीस यांचीही मदत घेण्यात आली. बोठे हैदराबाद येथील बिलालनगरमध्ये असल्याची माहिती मिळताच नगर पोलिसांची सहा पथके हैदराबादला रवाना झाली. तेथे पाच दिवस शोधमोहीम राबवली. प्रथम तीन वेळा बोठेने पोलिसांना गुंगारा दिला. अखेर सापळा रचत पोलिसांनी बोठे याच्यासह त्याला मदत करणाऱ्या पाच जणांना जेरबंद केले. महेश तनपुरे हा बोठेचा खास पंटर. फरार झाल्यानंतर बोठे त्याच्याच संपर्कात होता. तनपुरे नगरमधून सर्व मदत पुरवीत होता. बोठे याच्याकडील पैसे संपल्याने दोन दिवसांपूर्वी बोठे आणि तनपुरे यांचा संपर्क झाला हाेता. तनपुरे त्याला पैसे पाठविणार होता. दरम्यान पेालिसांची नजर तनपुरेवर होती. तनपुरेच्या संपर्कातूनच पोलीस बोठेपर्यंत फरार झाल्यानंतर बोठे संपर्कासाठी जो मोबाईल वापरत होता तो मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे. विशेष म्हणजे हा मोबाईल २०१८ मध्ये एका कुख्यात गुन्हेगाराने वापरल्याचे समोर आले आहे. त्या अनुषंगानेही पोलिसांनी तपास सुरू केला आहे. बोठेला पोलिसांनी अटक केली याचे जरे कुटूंबियांना समाधान आहे. आमच्या कुटुंबाच्या संपर्कात बोठे होता. मात्र, त्यानेच घात करत माझ्या आईची हत्या केली. त्याच्या अटकेसाठी मी व माझे वकील एस.एस. पटेकर सतत पाठपुरावा करत होतो. मात्र आता बोठेला अटक झाली असून त्याला कठोर शिक्षा मिळावी, हीच आता आमच्या कुटुंबीयांची अपेक्षा आहे. असे रुणाल जरे आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, पोलीस उपाधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके, निरीक्षक यादव, संभाजी गायकवाड, ज्योती गडकरी, सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, मिथुन घुगे, दिवटे, उपनिरीक्षक समाधान सोळंके, हेड कॉन्स्टेबल रवींद्र पांडे, सहायक फौजदार राजेंद्र वाघ, प्रकाश वाघ, पोलीस नाईक रविकिरण सोनटक्के, दीपक शिंदे, राहुल गुंडू, अभिजित अरकल, जयश्री फुंदे, संजय खंडागळे, संतोष लोढे, गणेश धुमाळ, सचिन वीर, सत्यम शिंदे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

नगरचा ‘बीबी’ हैदराबादमध्ये झाला बी.बी. पाटील

बिलालनगर हे गुन्हेगारांचे आश्रयस्थान म्हणून ओळखले जाते. याच ठिकाणी बाळ बोठे वास्तव्य केले. येथे बोठेने वकील जर्नादन अकुला चंद्राप्पा याच्या मदतीने आश्रय घेतला होता. चंद्राप्पा याच्या संपर्कात बोठे हा उस्मानिया विद्यापीठातून पीएच.डी. मिळविण्याच्या निमित्ताने आला होता. त्यामुळे या दोघांची ओळख होती. हैदराबाद येथे बोठे याने बीबी ऐवजी बी.बी. पाटील हे नाव धारण केले होते. याच नावाने त्याने तेथील हॉटेलमध्ये रूम बुक केली होती. ओळख लपविण्यासाठी त्याने दाढीही वाढविली होती.

बोठेला मदत करणारी ‘ती’ महिला कोण?

बोठे याला ताब्यात घेतल्यानंतर आणखी नवनवीन माहिती समोर येत आहे. बोठे याला हैदराबाद येथे पी. अनंतलक्ष्मी व्यंकटम सुब्बाचारी या महिलेने मदत केल्याचे समोर आले. पोलिसांनी तिचा शोध सुरू केला असता अनंतलक्ष्मी फरार झाली आहे. तिने बोठेला कशा पद्धतीने मदत केली, याचा पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान फरार झाल्यानंतर बोठेला कोणी कोणी मदत केली याचाही पोलीस शोध घेत आहे. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.