रेखा जरे खून प्रकरणात बाळ बोठे फरार घोषित; न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   गुरुवारी अखेर बाळ बोठे याला न्यायालयाने फरार घोषित केले आहे. बोठे हा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या आणि यशस्वी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे  खून प्रकरणी पसार झालेले आहे. दरम्यान,  ९ एप्रिलपर्यंत न्यायालयासमोर हजर व्हावे, अन्यथा पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेश न्यायालयाने सुनावले आहे.

३० नोव्हेबर २०२० रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास पारनेर तालुक्यातील जतेगाव घाटात रेखा जरे यांच्यावर अज्ञात मारेकऱ्यांनी हल्ला केला होता. मोटरसायकल (क्रमांक एम एच 17-2380) वरून आलेल्या दोन अज्ञात २५ ते ३० वयोगटातील तरुणांनी गाडीला धक्का लागल्याच्या कारणावरून रेखा जरे यांच्याशी वाद घातला होता. काही वेळाने या तरुणांनी धारदार शस्त्रानं रेखा जरे यांच्या गळ्यावर वार केले होते. गंभीर जखमी अवस्थेत रेखा जरे यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आले होते. मात्र, त्या आधीच त्यांचा मृत्यू झाला होता.

दरम्यान, रेखा जरे यांचा खून करणाऱ्या पाच आरोपींविरोधात तपास अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांनी यापूर्वी १ हजार ५०० पानांचे दोषारोपपत्र (चार्जशीट) पारनेर न्यायालयात दाखल करण्यात केले होते. मृत जरे यांच्या खुनात सहभाग असणारा पत्रकार बाळ बोठे हा गेल्या ३ महिन्यापासून पसार आहे. याबाबत पारनेर न्यायालयासमोर सुनावणी झाली, यावेळी न्यायालयाने बाळ बोठे याला फरार घोषित केले आहे. या प्रकरणी पारनेर तालुक्यातील सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पाच हल्लेखोरांना अटक करण्यात आली. रेखा जरे यांची सुपारी ही अहमदनगरचा ज्येष्ठ पत्रकार बाळ बोठे याने दिल्याचे तपासातून समोर आले आहे. बाळ बोठे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.