रेखा जरे हत्याकांड : ‘बाळ’ला 7 दिवसांचा PCR, बोठेच्या अंगझडतीत सापडली सुसाईड नोट, जाणून घ्या काय लिहीलंय चिठ्ठीमध्ये

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात गाजलेल्या रेखा जरे हत्याकांडातील मुख्य आरोपी बाळ जगन्नाथ बोठे याला अहमदनगर पोलिसांनी हैदराबाद येथून अटक केली. हत्याकांडानंतर बाळ बोठे तीन महिने फरार होता. पोलिस त्याचा शोध घेत होते, मात्र तो पोलिसांना सापडत नव्हता. अखेर शनिवारी बोठे याला हैदराबाद येथे अटक करण्यात आली. आरोपी बाळ बोठे याला अटक केली त्यावेळी त्याच्या खिशात सुसाईड नोट सापडल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.

सुसाईड नोटमध्ये लिहलं…

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य सुत्रधार बाळ बोठे हा गुन्हा घडल्यापासून अडीच महिने फरार होता. पोलिसा त्याचा शोध घेत होते. अखेर काल त्याला हैदराबाद येथे बेड्या ठोकण्यात आल्या. त्याची झडती घेतली असता त्याच्या खिशात पोलिसांना सुसाईड नोट सापडली. सुसाईड केल्यानंतर माझ्या कुटुंबियांना संपर्क करा असा उल्लेख यामध्ये आहे. हैदराबादमध्ये अटक केल्यानंतर बाळ बोठेला पारनेर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले.

7 दिवसांची पोलीस कोठडी

बाळ बोठेला आज (रविवार) पारनेर न्यायालयात हजर केले. यावेळी पोलिसांनी न्यायालयाकडे त्याच्या पोलिस कोठडीची मागणी केली. मागील तीन महिन्यापासून बोठे हा फरार होता. त्याला या कालावधीत कोणी कोणी मदत केली. तसेच रेखा जरे यांची हत्या कोणत्या कारणामुळे केली, याचा उलगडा अद्याप झालेला नाही. त्यासाठी पोलीस कोठडीची मागणी सरकारी वकील सिद्धीर्थ बागले यांनी न्यायालयाकडे केली. त्यानुसार न्यायालयाने बाळ बोठे याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

बोठेला मदत करणारे आरोपींना अटक

जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी सांगितले की, बाळ बोठे याला मदत करणारे आंध्र प्रदेशातील जनार्दन चंद्राप्पा, राजशेखर चाकाली, शेख इस्माईल शेख अली, अब्दुल रहमान अब्दुल आरीफ व महेश वसंतराव तनपुरे (रा. नवलेगनर, सावेडी, अहमदनगर) यांना अटक करण्यात आली आहे. तर पी.अनंतलक्ष्मी व्यंकटम सुब्बाचारी (रा. हैदराबाद) ही महिला आरोपी फरार आहे.

काय आहे प्रकरण ?

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांचा 30 नोव्हेंबर रोजी नगर-पुणे महामार्गावर पारनेर तालुक्यातील जातेगाव घाट परिसरात गळा चिरून निर्घृण खून करण्यात आला होता. या घटनेनंतर पाच आरोपींना अटक केली. रेखा जरे यांच्या खुनाची सुपारी देणारा बाळ बोठे मात्र फरार झाला होता. पोलिस बोठे याच्या मागावर होती. बोठे याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके तयार करण्यात आली होती. बोठे हा हैदराबाद येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांच्या सहा पथकांनी पाच दिवस हैदराबादमध्ये बोठेचा शोध घेतला. हैदराबाद येथील बिलालनगर परिसरात बोठे याच्यासह त्याला मदत करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या.